माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम देशाबाहेर म्हणजेच संपूर्ण जगात करत आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी मागील आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे याची कल्पना जनतेला मोदींनी द्यायला हवी असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची प्रतिष्ठा जगात जपत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत शरद पवार काय म्हणाले?

आज देश एका वेगळ्या दिशेने चालला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. काही राजकीय विचारांच्या संबंधी आमची आणि त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

What Shard Pawar Said?
शरद पवार यांनी काय काय मुद्दे मांडले आहेत? (फोटो-शरद पवार, फेसबुक पेज)

खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची प्रतिष्ठा जगात जपत आहेत. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले आम्ही सहमत नाही त्यांच्या विधानाशी सहमत नाही. इंदिरा गांधींशी शरद पवार सहमत आहेत का? इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग हे परदेशवारीला गेल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी कधीही मीडियापासून पळ काढला नाही. १२ वर्षे मोदी मीडियापासून का पळ काढत आहेत? याचा अर्थ हाच आहे की तुम्हाला सत्य लपवायचं आहे त्यामुळेच तुम्ही पळ काढत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॉर्वेतल्या पत्रकाराच्या प्रश्नाला का सामोरे गेले नाहीत? त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धोका नाही का? त्या पत्रकार मुलीला सांगितलं असतं की मी नंतर उत्तरं देतो, लिहून पाठवतो. पण ते तसं त्यांनी सांगितलं नाही. कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाने अशा प्रकारे पळ काढू नये.शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील. पण कुठलीही धोरणं जाहीर करताना पंतप्रधान कुणालाही विश्वासात घेत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या लोकांनाही ते विश्वासात घेत नाहीत.

इंदिरा गांधी आणि पंडीत नेहरुंची काय आठवण शरद पवारांनी सांगितली?

मुंबईतील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, मी संयोजकांचे धन्यवाद मानतो. आज हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. मी वयाच्या अठराव्या वर्षी मी पुण्यात युवक काँग्रेसमध्य़े सहभागी झालो होतो. आम्ही काम करत असताना इंदिरा गांधी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. इंदिरा गांधी नंतर पंतप्रधान झाल्या, त्यांचा रशिया दौरा झाला. त्यावेळी इंदर कुमार गुजराल हे राजदूत होते. एक संकेत असा आहे की दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आल्यानंतर त्याचं स्वागत करायचं असतं. पण त्यांचं स्वागत करायला रशियाचा एकही नेता आला नव्हता. गुजराल हे त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी इंदिरा गांधींचं स्वागत केलं. ज्यानंतर इंदिरा गांधी गुजराल यांना म्हणाल्या की भारतीय दुतावास जिथे आहे तिथे जायचं. इथे जे लोक राहतात त्यांची जी लहान मुलं आहेत त्यांना बोलवा. त्याप्रमाणे मुलांना बोलवण्यातआलं, त्यानंतर इंदिरा गांधी लहान मुलांबरोबर खेळायला लागल्या. रशियाचे राष्ट्रपती यांच्या लक्षात आले की आपण स्वागत केले नाही. कारण इंदिरा गांधी या त्यांच्या निवासस्थानी न जाता भारतीय दुतावासामध्ये गेल्या. रशियाच्या राष्ट्रपतींना जेव्हा आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. इंदिरा गांधींचा सन्मान केला नाही, त्यांना घ्यायला गेलो नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ज्यानंतर ते दुतावासात गेले आणि इंदिरा गांधींकडे दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या मी ४० कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करते. त्या जनतेची प्रतिष्ठा जर कुणी सांभाळात नसेल तर मी ते सहन करणार नाही असं इंदिरा गांधी यांनी सांगितलं.’ अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.

पंडीत नेहरु काय बोलायचं आहे विसरले तो किस्सा काय?

आम्ही इंदिरा गांधींना विनंती केली होती की आम्हाला पंडीत नेहरुंना भेटायचं आहे. त्यानंतर एक मिटिंग आयोजित करण्यात आली. त्या मिटिंगला नेहरु असतील असं आम्हाला सांगण्यात आलं. मी शेतकऱ्यांचे प्रश्न पंडीत नेहरुंच्या समोर मांडायचं ठरवलं होतं. माझ्याप्रमाणे सगळ्यांनीच ठरवलं होतं की काय बोलायचं. पंडीतजी त्या मिटिंगला आले आणि काय बोलायचं ते विसरुन गेले. पण त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्याची छाप पडत असे. अशा अनेक गोष्टी मला राजकारणात पाहण्यास मिळाल्या.