पंतप्रधानांच्या मौनाने देशात निराशेचे मळभ; भाजपची टीका

दोन सत्ताकेंद्रे आणि पंतप्रधानांचे निष्क्रिय मौन यांमुळे देशावर निराशेचे मळभ आले आहे, अशी सणसणीत टीका भारतीय जनता पक्षाने यूपीए सरकारवर केली. यूपीए – २ सरकारची चार वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या सरकारच्या कारकिर्दीवर भाष्य करण्यासाठी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

दोन सत्ताकेंद्रे आणि पंतप्रधानांचे निष्क्रिय मौन यांमुळे देशावर निराशेचे मळभ आले आहे, अशी सणसणीत टीका भारतीय जनता पक्षाने यूपीए सरकारवर केली. यूपीए – २ सरकारची चार वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या सरकारच्या कारकिर्दीवर भाष्य करण्यासाठी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
चार वर्षांच्या पूर्ततेनंतरही सरकारची पाटी रिकामीच आहे, त्यावर साजऱ्या करण्यायोग्य एकाही बाबीची नोंद नाही अशी टीका या दोघांनीही सरकारवर केली. देशावर निराशा, नकारात्मकता आणि विषण्णता दाटली आहे, इतिहासात प्रथमच देशभरात सरकारबद्दल इतक्या औदासिन्याची भावना पसरली आहे, असा आरोपही जेटली यांनी सरकारवर केला.
देशासमोरील प्रश्न मग ते नेतृत्वाचे असोत, अर्थव्यवस्था सुधारण्याचे असोत, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचे असोत, स्त्रियांच्या सुरक्षिततेचे असोत किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे असोत, सरकार सर्वच आघाडय़ांवर नापास झाले आहे, असे विरोधकांनी सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे नेतेही नाहीत किंवा काँग्रेसचे नेतेही नाहीत. सिंग यांचे सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकींना बसतात खरे मात्र त्यांचे सारे लक्ष यूपीए अध्यक्षांकडे म्हणजेच सोनिया गांधींकडे असते, अशी टीका या वरिष्ठ भाजप नेत्यांनी पंतप्रधानांवर केली. जेटली यांनी स्वराज यांचीच री ओढत पंतप्रधानपदाचे अवमूल्यन करण्याचे पातक या सरकारने केले असल्याचा आरोप केला.
आगामी निवडणुकांत पंतप्रधानपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर बोलताना स्वराज यांनी याचा निर्णय भाजपची संसदीय समिती घेईल असे स्पष्ट केले. मात्र समितीच्या निर्णयावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांचे मतही विचारात घेतले जाईल, असे सूचक विधान त्यांनी केले. २०१४ मधील निवडणुकांसाठी रालोआत अधिकाधिक पक्ष सामील होतील असा विश्वासही स्वराज यांनी व्यक्त केला.
कॅग, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि निवडणूक आयोग या सर्वच यंत्रणांचे ‘निर्बलीकरण’ करण्याचा सरकारने जणू विडाच उचलला आहे, असा आरोपही जेटली यांनी सरकारवर केला.

आगामी निवडणुकांत पंतप्रधानपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर बोलताना स्वराज यांनी याचा निर्णय भाजपची संसदीय समिती घेईल असे स्पष्ट केले.

भाजप नेत्यांनी डोळे तपासून घ्यावेत: काँग्रेसचा टोला
भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या सत्ताधारी काँग्रेसने अखेर विरोधकांवर शरसंधान केले आहे. सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मोतिबिंदू तपास शिबिरास भाजप नेत्यांनी हजेरी लावावी, असा टोला सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी लगावला आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाला निश्चितच सन्मानाचे स्थान असते, पण त्यासाठी विरोधी पक्षही तुल्यबळ असावा लागतो. इथे भाजपला गंभीर दृष्टिदोष झाला आहे. पहिल्यांदा सरकारी नेत्रचिकित्सा शिबिरांना हजेरी लावून त्यांनी तो दूर करून घ्यावा, असे रेणुका चौधरी म्हणाल्या. भारताला नेहमीच जबाबदार विरोधी पक्षाची वानवा जाणवली आहे. इतिहास भाजपची नोंद एक सातत्यशील नकारात्मक विरोधी पक्ष म्हणूनच घेईल, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. मात्र येत्या निवडणुकांतही त्यांचे विरोधी पक्ष म्हणून स्थान अबाधित राहील असे उपरोधिक बोल रेणुका चौधरी यांनी सुनावले.
काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनीही अन्य ठिकाणी बोलताना विरोधकांवर हल्लाबोल चढवला. भाजप म्हणजे ‘कोल्ह्य़ाला द्राक्षे आंबट’ अशीच परिस्थिती आहे, असा आरोप त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pms silence has led to pessimism in the country bjp

ताज्या बातम्या