पंजाब नॅशनल बँकेला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला सलग चौथ्यांदा लंडनमधील न्यायालयाने दणका दिला. लंडनमधील हायकोर्टाने बुधवारी नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्याला आता आणखी काही काळ तुरुंगात रहावे लागणार आहे.

पीएनबीला दोन अब्ज डॉलर्सना गंडा घालणारा हिरेव्यापारी नीरव मोदी हा लंडनमध्ये पळाला होता. मार्च महिन्यात नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी नीरव मोदीच्या वतीने तीन वेळा जामीन अर्ज करण्यात आला. मात्र, लंडनमधील वेस्टमिनस्टर दंडाधिकारी न्यायालयाने तिन्ही वेळेला त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तीनदा अपील केल्यानंतर नीरव मोदीला हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. अखेर त्याने ब्रिटनमधील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. बुधवारी दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते.

हायकोर्टाने जामीन नाकारताना काही घटनांचा दाखलाही दिला. कैरो येथील साक्षीदारांवर दबाव टाकला. याशिवाय दुबईतील सर्व्हर नष्ट करणे आणि डमी संचालकांचे मोबाइल फोन नष्ट करण्यात आले होते, याचा उल्लेख हायकोर्टाने केला. जामीन हमी दुप्पट म्हणजे २० लाख पौंडपर्यंत पोहोचली आहे. यावरुन आरोपी फरार होण्याची शक्यता जास्त असल्याचे हायकोर्टाने नमूद केले.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत ब्रिटिश न्यायालयाने त्याची कोठडी २७ जूनपर्यंत वाढवली होती. आता हायकोर्टाने जामीन नाकारल्याने नीरव मोदीला २७ जूनपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे.