scorecardresearch

मेहुल चोक्सीला आणण्यासाठी गेलेले भारतीय अधिकारी रिकाम्या हाती परतले; मोदी सरकारची निराशा

डोमिनिकात गेलेलं भारतीय पथक मायदेशी परतलं आहे, प्रत्यार्पणासाठी अजून एक महिना प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता

PNB Scam Mehul Choksi not fetched by CBI team disappointment to Modi Government
मेहुल चोक्सीला किमान अजून महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे

पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या हेतूने डोमिनिकाला गेलेलं भारतीय पथक मायदेशी परतलं आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असून अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. मात्र इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीशिवाय पथक परतलं आहे.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी गेलं होतं अधिकाऱ्यांचं पथक

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यास त्याला आणण्यासाठी २८ मे रोजी भारतीय अधिकाऱ्यांचं पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. मेहुल चोक्सीला किमान अजून महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

“मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करावं लागेल”, डोमिनिका सरकारचा कोर्टात युक्तिवाद

मेहुल चोक्सी सध्या अटकेत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

रक्ताळलेला डोळा… हातावर काळे व्रण; मेहुल चोक्सीचे कोठडीतील फोटो आले समोर

मेहुल चोक्सी याने कोर्टात एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? तसंच त्याला कोणत्या देशात परत पाठवलं जावं यावर सुनावणी सुरु आहे. तर दुसऱ्या प्रकरणात मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या दोन प्रकरणांचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणं अशक्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2021 at 12:25 IST

संबंधित बातम्या