पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी तीन वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

याचिकेवरील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या वकील क्लेअर मोंटगोमेरी यांनी नीरव मोगी आणि त्याच्या भावामध्ये झालेले ईमेल संभाषण वाचून दाखवले. या इमेलवरून पुराव्यांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच अबुधाबीच्या ज्या साक्षीदारांनी ईडीच्या इमेलला उत्तर दिले आहे, त्यांनाही आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच नीरव मोदी लंडनमध्ये भांडवल गोळा करण्यासाठी आला असून त्याला जामीन मिळाल्यास त्याने स्वत:ला इलेक्ट्रॉनिक उपकरणाने टॅग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या माध्यमातून त्याला ट्रॅक करता येऊ शकते, असे त्याच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू झाला असून त्याच्या पलायनाचा प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. अशातच त्याला जामिन मिळाल्यास समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्या विरोधातील आरोप गंभीर आहेत. अशा परिस्थितीत त्याला जामीन देण्यात येऊ नये, असे भारत सरकारची बाजू मांडणारे क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विसेसकडून सांगण्यात आले.

नीरव मोदीकडे वकीलांची उत्तम टीम असून ती त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी भारत सरकारच्या खटल्याचा सामना करण्याची तयारी करत आहेत. त्याच्याकडे प्रत्यार्पण रोखण्याची संधी आहे. परंतु त्यानंतरही त्याचे प्रत्यार्पण झाल्यास त्यावेळी त्याला अटक केली जाऊ शकते, असे मत न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आले.