पीटीआय, इस्लामाबाद
पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सुरक्षा दलांबरोबर सोमवारी झालेल्या संघर्षात बंदी घालण्यात आलेल्या ‘जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी’ (जेएएसी)च्या २० कार्यकर्त्यांचा मृत्यू, तर दोन डझनहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती संघटनेने बुधवारी दिली. सुरक्षा दलांनी मृतांच्या आकड्याबाबत संशय व्यक्त केला, तसेच ‘जेेएएसी’च्या निदर्शकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.
पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत ५३ जागा आहेत, त्यापैकी ४५ जागा थेट निवडणुकीद्वारे निवडल्या जातात, तर आठ जागा महिला, तंत्रज्ञ आणि धर्मगुरूंसाठी राखीव आहेत. येथील १२ वादग्रस्त जागांवरून ‘जेएएसी’ गेल्या महिन्याभरापासून निदर्शने करत आहे. सोमवारी १३ जागांसाठी मतदानाचा पहिला टप्पा पार पडत असताना, ‘जेएएसी’ने रावलकोटपासून मुझफ्फराबादच्या दिशेने मोर्चा काढला. ‘जेएएसी’ने दावा केला की, मोर्चात सहभागी झालेल्यांवर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात अनेक कार्यकर्ते मारले गेले.
दरम्यान, सुरक्षा दलांनी निदर्शकांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याच्या वृत्ताची त्वरित, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहन ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना केले आहे.
केंद्राचे मौन, फारुक यांचे प्रश्नचिन्ह
श्रीनगर : पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या मौनावर नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे, असेही अब्दुल्ला म्हणाले.
निदर्शक भारताप्रमाणेच शत्रू : आसिफ
पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शक हे भारताप्रमाणेच शत्रू आहेत. त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ मंगळवारी म्हणाले. “आंदोलकांशी कोणताही संवाद साधला जाणार नाही. मी त्यांना भारताच्याच श्रेणीत ठेवतो, त्यांना भारताप्रमाणेच मानतो आणि पाकिस्तानचे शत्रू समजतो,” असे आसिफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
