पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घेणं देखील मुश्किल झालं आहे. महागाईने पाकिस्तानात उच्चांक गाठला असून पाकिस्तानी जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. महागाईच्या विरोधात तेथील जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरत, आंदोलन करत सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत. पण सरकारकडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. कोटलीमध्ये मोर्चा काढणाऱ्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यांनुसार, सरकारकडून दडपशाही सुरू असून गेल्या चार दिवसांत ४० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. मात्र, या संदर्भात पाकिस्तान सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकताच कोटली येथील एका चौकात महिला सुरक्षित ठिकाणी पळताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत अशांततेदरम्यान एक व्यक्ती गोळीबार करताना दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओची पडताळणी झालेली नाही किंवा यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात झालेल्या मृत्यूच्या आकड्यांची देखील पडताळणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, पाकिस्तानने नागरिकाचा मृत्यू झाल्याचं नाकारलं आहे. तसेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील पोलीस प्रमुखांनी आंदोलकांवरच आरोप करत रावलाकोटमध्ये बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकांनीच गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.
वीज आणि पिठाचे वाढलेले दर, वाढलेली महागाई आणि सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष सवलतीसंह आदी मागण्यांच्या विरोधात नागरिकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. तसेच विधानसभेतील राखीव जागांबाबत देखील एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या सावटाखाली निवडणुका
दरम्यान, पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (PoJK) सध्या विधानसभेसाठी तीन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात, मीरपूर विभागात, दुसऱ्या टप्प्यात कोटली आणि तिसऱ्या टप्प्यात रावलकोट. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोटलीमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार आणि फेरफार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच आता सुधनोटी आणि रावलकोट येथील मतदान १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या हिंसाचाराच्या घटनांवरून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या काही पाकिस्तानी नागरिकांनी ‘आझादी’च्या घोषणा देत आंदोलन केलं आहे. लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर मोर्चा काढला आहे.
