India Reaction POK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरु असणारे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारकडून हिंसक कारवाईचे पाऊल उचलले आहे. या कारवाईबाबत भारताने आज (शुक्रवारी) प्रतिक्रिया दिली. “पाकिस्तानच्या कारवाईत जवळपास ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने दडपशाहीची दखल घ्यावी आणि आणि मानवाधिकार उल्लंघनाबाबत पाकिस्तानला जबाबदार धरावे”, अशी प्रतिक्रिया भारताने दिली.

रणधीर जयस्वाल काय म्हणाले?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पीओकेमधील परिस्थितीवर भाष्य केले. “पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या शांततापूर्ण आंदोलनातील नागरिकांवर बळाचा वापर केला जात आहे. लष्करी कारवाईत ४० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत”, असे जयस्वाल म्हणाले. येथील नुवडणुकांबाबतही नागरिकांनी रोष व्यक्त केल्याचे जयस्वाल म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवरुन नागरिकांचा रोष

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेच्या ४५ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होत आहे. येत्या १० ऑगस्ट रोजी या निवडणुका समाप्त होतील, येथील विधानसभेत एकूण ५३ जागा आहेत; त्यापैकी ४५ सदस्यांची थेट निवड होते, तर ८ जागा महिला, तंत्रज्ञ आणि धर्मगुरूंसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाने १३ पैकी ९ जागा, तर उर्वरित जागांवर पाकिस्तान पीपल्स पार्टी विजयी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.

१२ जागांचा मुद्दा

गेल्या दोन महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड निदर्शने सुरू आहेत. ‘जॉइंट अवामी एक्शन कमिटी’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. बाहेरील रहिवाशांसाठी राखीव असलेल्या १२ जागांच्या मुद्द्यावरुन तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. सरकार स्वतःच्या पसंतीचा पंतप्रधान बसवण्यासाठी या राखीव जागांचा गैरवापर करत आहे, असा आरोप जॉइंट अवामी एक्शन कमिटीने केला आहे. यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेवर पाकिस्तानचे नियंत्रण वाढते.

संरक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आंदोलकांवर सरकारने केलेल्या कारवाईचे समर्थन केले. आसिफ यांनी आंदोलकांची तुलना चक्क भारताशी करत त्यांना “भारतासारखे शत्रू” असे संबोधले आणि आंदोलकांशी कोणतीही चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला.