PoK protest Pakistan army clash 30 Death: पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनकर्ते आणि पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला असून, २०० नागरिक जखमी झाले आहेत. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीने पाकव्याप्त काश्मीरमधील आर्थिक आणि राजकीय समस्यांवरुन सरकारविरोधात काढलेला मोर्चा अवैध ठरवत बंदी घातली. यानंतर आंदोलनकर्ते आणि पाकिस्तानी जवानांमध्ये चकमक झाली.

आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक

कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीचा मोर्चा स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर ठरवत त्यावर बंदी घातली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री रावलकोट भागात एका व्यापाऱ्याची गोळी मारुन हत्या करण्यात आली, प्रशासनाकडूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आंदोलक रस्त्यावर उतरले होते. रविवारी रात्री जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीच्या आंदोलकांनी रुग्णालय आणि शवगराच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली. “पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात सहा आंदोलकांचा मृत्यू झाला”, अशी माहिती पूंछ विभागाचे पोलिस अधीक्षक सरदार वाहीद खान यांनी रॉयटर्सला दिली आहे.

विविध मुद्यांवरुन नागरिक उतरले रस्त्यावर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रयत्न केला. पण, आंदोलकांनी रायफल, पेट्रोल बॉम्ब आणि विविध शस्त्रांनी लक्ष्य केलं, असे पोलिसांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढती महागाई, वीजेचे बिल, वाढती बेरोजगारी आणि राजकीय हक्क यावरुन नागरिक रस्त्यावर उतरल्याचे वृत्त ट्रिब्युनने दिले आहे. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलक रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर आंदोलक, पोलिस आणि जवानांमध्ये चकमक उडाली, असे या बातमीत पुढे म्हटले आहे.

विविध व्हिडीओ समोर

सरकारविरोधी आंदोलनाचे विविध व्हिडीओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये बरनाला, भिमबर आणि मीरपूर येथे आंदोलकांची मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. मुझफ्फराबादमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर तणाव वाढल्याने शहरातील बाजारपेठा बंद असल्याचे इतर फुटेजमध्ये दिसत आ.

३० जणांचा मृत्यू

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या चकमकीत जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून, यात सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलातील जवानांचा देखील समावेश आहे. मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा आरोप देखील केला जात आहे. दरम्यान, यानंतर पाकिस्तानने या भागात अधिक सुरक्षा तैनात केली असल्याची माहिती समोर आली आहे.