POK Protest: पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून हे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लष्काराच्या दडपशाहीनंतरही पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत. गेल्या दोन- तीन दिवसांत झालेल्या हिंसाचारात लष्काराने केलेल्या गोळीबारात ३७ जणांचा मृत्यू झाला.
आंदोलकांकडून पाकिस्तान लष्कर, सरकारविरोधात घोषणाबाजी
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन दडपण्यासाठी लष्कराकडून सुरु असलेल्या प्रयत्नाविरोधात नागरिकांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलकांनी सरविरोधात घोषणा देण्यासाठी “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है”, या भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांच्या प्रसिद्ध काव्यरचनेची मदत घेतली.
‘इंकलाब जिंदाबाद’ची घोषणा
आंदोलकांकडून १९२१ मध्ये उर्दू कवी आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना हसरत मोहानी यांनी तयार केलेला “इंकलाब जिंदाबाद” ही घोषणा देखील दिली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथून एक व्हिडीओ समोर आला आहे. येथील एका बस स्थानकावर बसलेल्या आंदोलकांकडून “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…” च्या घोषणा दिल्या जात आहेत.
हिंसाचारात ३७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू
पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, यात ३७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीचे सदस्य उमर नजीर यांचे बंधू उस्मान नजीर यांचाही समावेश आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. या निवडणुकांवर हिंसाचार, निवडणुकीत फेरफार केल्याचे आरोप आणि नागरिकांना बेपत्ता होण्याच्या घटनांचे सावट आहे.
