PoK protests Pakistan army: वाढती महागाई, विद्युत पुरवठा आणि गव्हाच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना धारेवर धरले. दरम्यान, आता या भागातील संतप्त नागरिकांना आता पाकव्याप्त काश्मीरमधील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तान सरकार, लष्करावर गंभीर आरोप

जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अ‍ॅक्शन कमिटी आणि अवामी अ‍ॅक्शन कमिटीने रावळकोट येथे केलेल्या आंदोलनात सरकारवर जोरदार वार केला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारवर टीका करताना त्यांनी पुरवठा रोखल्याचा, स्थानिक स्त्रोतांची अडवणूक केल्याचा आणि भारताबरोबर आर्थिक निर्बंध लादल्याचा आरोप केला. यापूर्वी देखील २०२४ आणि २०२५ मध्ये या भागातील नागरिकांनी वाढती महागाई, इलेक्ट्रिसिटी बील आणि पाकिस्तानच्या आर्थिक धोरणावर आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला होता. पाकिस्तानने आंदोलनाची दखल घेऊन नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता, यावर देखील स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

सरदार अमन यांचे विविध आरोप

रावळकोट येथील आंदोलनाला संबोधित करताना जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अ‍ॅक्शन कमिटीचे नेते सरदार अमन यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करावर गंभीर आरोप केले. पाकव्याप्त काश्मीरमधील पुरवठा रोखण्यासह आर्थिक निर्बंध लादून दबाव निर्माण केल्याचा आरोप सरदार अमन यांनी केला. पाकिस्तानी लष्कर आमचे अन्नधान्य रोखत आहे, असा थेट आरोप अमन यांनी यावेळी केला. आर्थिक निर्बंधाच्या माध्यमातून सरकार आंदोलनाची धार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सरदार अमन यांनी केला. अमन यांनी पाकिस्तानवर नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी आणि स्त्रोतांची लूट केली जात असल्याचा आरोपही केला.

पाकिस्तानबरोबर व्यापारी मार्ग खुला करा – सरदार अमन

पाकिस्तानकडून आर्थिक मदत आणि पुरवठ्याची हमी मिळणार नसल्यास भारताबरोबर व्यापारी मार्ग खुला करण्याची मागणी सरदार अमन यांनी यावेळी केली. “पाकिस्तान किंवा भारत, यांच्याबरोबर सर्व व्यापारी मार्ग खुले करावेत”, असे अमन म्हणाले. आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. यामुळे निर्माण झालेली चीड आणि संताप त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्य तैनात केल्याबाबत भाष्य करताना अमन यांनी, भारतापासून बचाव करण्याची जबाबदारी आमची आहे, तो तुमचा विषय नाही, असेही त्यांनी पाकिस्तानला सुनावले. तसेच, स्थानिकांना त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्याचे आवाहनही केले.