हरियाणात नमाज पठणास विरोध, पोलिसांकडून ३० जणांवर कारवाई, नेमका काय आहे वाद?

हरियाणातील गुडगावमध्ये नमाज पठणाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय.

हरियाणातील गुडगावमध्ये नमाज पठणाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय. गुडगावमधील सेक्टर १२ (अ) येथे नमाज सुरू असतानाच त्यात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतलंय. मागील अनेक दिवसांपासून काही धार्मिक संघटनांकडून या भागात सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध होतोय. आजही (२९ ऑक्टोबर) आंदोलकांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. यानंतर तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.

दरम्यान, गुडगावमधील सेक्टर १२ (अ) पूर्वी सेक्टर -४७ मधील मोकळ्या जागेत नमाज पठण करण्यासही या धार्मिक संघटनांनी विरोध केला होता. सलग पाचव्या आठवड्यात गुडगावमध्ये उघड्यावर नमाज पठण करण्यास विरोध केला जातोय.

नेमका वाद काय?

हरियाणातील गुडगावमध्ये २०१८ पासून सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध केला जातोय. विरोध करणाऱ्या गटाकडून नमाज पठण करणाऱ्यांवर रस्ता अडवण्याचा आणि शांतता भंग करण्याचा आरोप केला जातोय. २०१८ मध्ये प्रकरणी स्थानिक प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांसोबत बैठका घेऊन चर्चेअंती या परिसरात नमाज पठणासाठी ठिकाण निश्चित केलं. यानंतर २ वर्षे या विषयावर कोणताही वाद झाला नाही. मात्र, आता पुन्हा मागील ५ आठवड्यांपासून काही संघटनांकडून नमाज पठणाला विरोध होतोय.

नमाजला विरोध करणाऱ्यांची भूमिका काय?

नमाजला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, या ठिकाणी नमाज पठण करणं एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. याला विरोध केला नाही, तर नमाज पठणाच्या ठिकाणी मशीद बांधली जाईल, असा आरोप केला जातोय. उघड्यावर नमाज पठाण करण्याबाबत ही बाब आजपासून नाही तर २०१८ पासून सुरू आहे. त्यावेळी प्रशासनाने दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र बसवून समस्या सोडवली होती आणि नमाजसाठी सेक्टर ४७ मधील ठिकाण निश्चित केलं होतं. मात्र, नमाजाला विरोध करणाऱ्यांनी ही परवानगी कायमसाठी नव्हती, फक्त १ दिवसासाठी होती, असा दावा केलाय.

हेही वाचा : आंदोलक महिला शेतकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघींचा मृत्यू, राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“राजकीय लाभ मिळवण्यासाठी गोंधळाचा प्रयत्न”

मागील ३ वर्षांपासून या ठिकाणी नमाज पठणाला येथे येत असलेला तौफिक म्हणाला, “गेल्या काही आठवड्यांत हा प्रश्न तयार झाला आहे. काही लोक यातून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते गोंधळ निर्माण करत आहेत.” या महिन्याच्या सुरुवातीला पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात गुडगाव नागरिक एकता मंच (जीएनएम) या नागरिक मंचाने दावा केला आहे की गेल्या काही महिन्यांत तीन भागातील प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police detained 30 protester for disrupting namaz in gurgaon haryana pbs

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या