आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुती भागात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलिस आणि स्थानिकांमध्ये झालेला संघर्ष टोकाला गेला आहे. गुरुवारी (२३ सप्टेंबर) झालेल्या संघर्षात किमान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांचं एक पथक राज्याच्या शेती प्रकल्पाच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी आलेलं असताना हा संघर्ष झाल्याची माहिती मिळते. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि तितकाच भीतीदायक असल्याच्या प्रतिक्रिया आता सर्वच स्तरांत उमटताना पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा पोलीस कर्मचारी घटनासथळी पोहोचले तेव्हा हजारो स्थानिक या भागात जमा झाले आणि त्यांच्याविरोधात घोषणा देत आंदोलन करू लागले. यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मन विचलित करू शकतो. आसाम मंत्रिमंडळाने यापूर्वी अतिक्रमण झालेली पूर्ण जमीन वसूल करून त्याचं राज्य कृषी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

दारंग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, “या संघर्षात नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आतापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार दोन आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकची माहिती येत राहील.”

आसाम हे राज्य पुरस्कृत संघर्षात होरपळतंय | राहुल गांधी

धोलपूरवासीयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा निषेध व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे, “आसाम सध्या राज्य पुरस्कृत संघर्षात (आगीत) होरपळत आहे. मी राज्यातील आमच्या बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभा आहे. कोणत्याही भारतीयाने असा प्रकार सहन करणं योग्य नाही.”

निरंकुशपणे वागण्याचा सरकारचा निर्धार दिसतोय!

आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एपीसीसी) अध्यक्ष भूपेन कुमार बोराह म्हणाले की, विशेषत: करोनाच्या परिस्थितीत अशी अतिक्रमण हटविण्याची कृती अमानवी आहे. “सर्वोच्च न्यायालयाने करोना काळात अतिक्रमण हटविण्याची कृतीविरोधात निर्देश दिले होते. तरीही मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने या परिसरात राहणाऱ्या धौलपूरमधील रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी निरंकुशपणे वागण्याचा निर्धार केला आहे. अतिक्रमक हटविण्याची मोहीम राबवण्यापूर्वी सरकारने पुनर्वसन आणि पर्यायी घरांची व्यवस्था करायला हवी होती”, असं भूपेन कुमार बोराह म्हणाले.

“गरीब लोक कुठे जातील?कसे जगतील?”

“२०१६ मध्ये सत्तेवर आल्यापासूनच या परिसरातील लोकांना भाजप सरकारने वारंवार त्रास दिला आहे. जमीन आणि घरांच्या पर्यायी व्यवस्थेशिवाय हे गरीब लोक कुठे जातील आणि ते कसे जगतील? ते बहुतेक शेतकरी आहेत. सरकारचं काम लोकांच्या कल्याणासाठी काम करणं आहे. तुम्ही लोकांना अन्न, निवारा, शिक्षणासारख्या मूलभूत मानवी हक्कांपासून दूर ठेवू नका”, असं भूपेन कुमार बोराह म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police evict illegal encroachers in dholpur assam two killed several injured gst
First published on: 23-09-2021 at 20:22 IST