Bengaluru Bribe Case : बंगळूरमधील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाला तब्बल ४ लाखांची लाच घेताना लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आहे. यावेळी या पोलीस निरीक्षकाला लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी अटक केलं. या कारवाईच्या वेळी हायहोल्टेज ड्रामा घडल्याचं पाहायला मिळालं आहे, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

बंगळूरमधील केपी अग्रहार पोलीस ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक लॉटरी तिकीट सेटलमेंट प्रकरणात लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला आहे. वाद मिटवण्यासाठी आणि गुन्हा दाखल होण्यापासून टाळण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने ही मोठी रक्कम मागितली होती अशी माहिती आता समोर आली. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओत लोकायुक्तचे काही अधिकारी या पोलीस निरीक्षकाला अटक करताना दिसत आहेत. यावेळी संबंधित पोलीस निरीक्षक हा मोठ्याने आरडा-ओरडा करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे या कारवाई वेळी मोठा हायहोल्टेज ड्रामा घडल्याचं सांगितलं जात आहे.

बंगळुरूमधील लोकायुक्तच्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारी सापळा रचून चार लाखाची लाच घेताना या पोलीस निरीक्षकाला अटक केलं आहे. गोविंदराजू असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून लाच न दिल्यास दुसऱ्या एखाद्या प्रकरणात अडकवण्याची धमकी या अधिकाऱ्याने दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या पोलीस निरीक्षकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला ४ लाखांची लाच घेताना लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरील पोलिसांच्या निवेदनानुसार, गोविंदराजू या पोलीस अधिकाऱ्यावर आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.