Crime News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार होता त्या रस्त्यावर चुकून सायकल चालवल्याने एका मुलाला पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. गुजरातमधील लिंबायत येथे घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्याला प्रशासनाकडून चांगलीच शिक्षा देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून गुरूवारी सराव केला जात होता, यावेळी ही घटना घडली होती. यानंतर आता उपनिरीक्षक बी. गढवी यांना सूरतहून मोरबी येथे ट्रान्सफर करण्यात आले आहे, तसेच त्यांची बढती देखील एका वर्षासाठी रोखण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुक्रवारी पोलीस अधिकारी या मुलाच्या तोंडावर ठोसा मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सायंकाळी सुरतच्या लिंबायत येथे एका जाहीर सभेत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सूरत पोलीसांकडून पंतप्रधानांच्या ताफ्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्थेसंबंधी सराव केला जात होता.

गुरुवारी संध्याकाळी सुरू अलेल्या या सरावादरम्यान, लिंबायत येथील मुख्य रस्त्यावरून ताफा जात होता तेव्हा हा मुलगा सायकल चालवत जाताना पोलिसांना दिसला. हा ताफा पुढे निघून गेल्यानंतर मुख्य रस्त्यावर बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने त्या मुलाला पकडले. दुरून काढलेल्या व्हिडीओमध्ये हा अधिकारी त्या मुलाला मारहाण करत असल्याचे दिसून आले.

शुक्रवारी सुरतच्या वाहतूक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनिता वनानी सांगितले की पोलीस अधिकार्‍याची पंतप्रधान सुरक्षा बंदोबस्तातून बदली करून सुरत पोलीस कंट्रोल रूमध्ये करण्यात आली आहे.

त्यानंत विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त हेतल पटेल यांनी एक प्रेस नोट जारी करत सांगितले की, पीएसआय बीएल गढवी यांना मोरबीला पाठवण्यात आले आहे. असे वर्तन कदापि सहन केले जाऊ शकत नाही आणि आम्ही मोरबीच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून पीएसआयची एक वर्षाची वेतनवाढ थांबवण्याची विनंती केली आहे,असेही पटेल म्हणाले आहेत.