दृश्यम स्टाइल हत्येचा पोलिसांनी लावला छडा, सहा जणांना अटक

हत्या केल्यानंतर पीडित महिला रुक्सानाचा मृतदेह एका निर्माणधीन इमारतीत पुरण्यात आला होता

गुजरातमधील भुज येथून गूढ पद्धतीने बेपत्ता झालेल्या महिलेची तिच्याच पतीने हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. जून महिन्यात महिला बेपत्ता झाली होती. आरोपी पतीने हत्या करण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांची मदत घेतली होती. यामध्ये खासकरुन अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा समावेश होता. पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला असून सहा जणांना अटक केली आहे.

हत्या केल्यानंतर पीडित महिला रुक्सानाचा मृतदेह एका निर्माणधीन इमारतीत पुरण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुक्सानाचा पती इस्माइल, त्याचा चुलत भाऊ जावेद, जावेदचा मित्र साजिद खलिफा, त्याची पत्नी सायमा, शब्बीर जुसाब आणि अलताफ यांचा समावेश आहे.

इस्माइलचं दुसरं लग्न झालं होतं. यावरुन रुक्साना आणि त्याच्यात वाद होऊ लागले होते. यामुळेच रुक्सानाचा काटा काढायचं असं इस्माइलने ठरवलं होतं. इस्माइलने त्याचा चुलत भाऊ जावेदसोबत मिळून कट रचला. जावेदने त्याच्या कारमध्ये रुक्सानाची हत्या केली. नंतर आयेशा पार्क येथील एका प्लॉटवर शब्बीर आणि अलताफच्या मदतीने मृतदेह पुरला. कारच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याने पुरावा मिटवण्यासाठी त्यांनी ते जाळून टाकलं.

सहा महिन्यांपूर्वी सरकारने प्लॉटचा ताबा घेतल्यानंतर आरोपींनी मृतदेह बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी पुरला होता. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये यासाठी इस्माइलने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. इतकंच नाही तर गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पोलिसांनी योग्य तपास करावा असा निर्देश देण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रुक्सानाच्या आई आणि भावानेही भूज न्यायालयात याचिका दाखल केली होती. आम्हाला सुरुवातीपासून इस्माइलवर संशय होता. पण आम्ही आरोपीला संशय येऊ नये आणि त्याला पळून जाण्याची संधी मिळू नये यासठी गुप्तपणे तपास सुरु ठेवला होता’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police solver drushyam style murder case