बलात्कार आरोपीला अटक करण्यासाठी जाणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील नवादा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हे पोलीस कर्मचारी बलात्कार प्रकरणाचा तपास करत होते. आरोपीच्या घरी जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण केली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गावातील दोन मुलींचं अपहरण केलं होतं. नंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी जात असताना काहीजणांनी त्यांचा रस्ता अडवला. ‘जेव्हा आम्ही नदीकिनारी असणाऱ्या आरोपीच्या घराजवळ पोहोचलो तेव्हा आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्यातील काहीजण जखमी झाले आहेत’, अशी माहिती त्यांच्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे.

‘अपहरण झालेल्या मुली घऱी परतल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत गावात पोहोचले होते. यावेळी काही जणांनी पोलीस पथकावर हल्ला केला. हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव कुमार मिश्रा यांनी दिली आहे,

जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून तपास सुरु आहे.