नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (‘एआय’) ही भारतासाठी धोका नसून मोठी संधी ठरू शकते. मात्र, त्यासाठी धोरणात्मक स्पष्टता, व्यापक कौशल्यविकासाची आवश्यकता असेल, असा इशारेवजा सूर ‘भारत मंडपम’ येथे सोमवारी सुरू झालेल्या ‘एआय’ इम्पॅक्ट समिट’मधील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील रोजगारक्षमता : उद्याच्या नोकर्‍यांची तयारी’ या चर्चासत्रात उमटला.

यावेळी मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. नागेश्वरन यांनी हा बदल अचानक होणार नाही, तर त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, शासनाची क्षमता आणि राष्ट्रीय कटिबद्धता आवश्यक आहे, असे नमूद केले. त्यात खासगी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि धोरणकर्त्यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक असल्याचेही नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.  शैक्षणिक सुधारणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीसाठी ‘एआय’चा स्वीकार करून भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, असे नागेश्वरन यांनी यावेळी सांगितले. मशीन लर्निंग आणि मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळ एकमेकांना कमकुवत करण्याऐवजी पूरक म्हणून काम करणार्‍या सर्वात मोठ्या देशांपैकी भारत असू शकतो, असे ते म्हणाले.

‘एआय’ इम्पॅक्ट समिट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आयोजित करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी परिषद आहे. ‘एआय’चा भारताच्या नजिकच्या भवितव्यावर कसा परिणाम होईल हे केंद्राकडून जाणीवपूर्वक घेतल्या जाणार्‍या धोरणात्मक निर्णयांवर अवलंबून असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आपोआप होऊ देण्याऐवजी तो व्यापक रोजगारनिर्मितीशी जोडणे गरजेचे आहे, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मांडले.

तापमान वाढीबाबत हवामान विभागाचा इशारा काय ?

दरवर्षी लाखो नोकर्‍या निर्माण होत असल्या तरी कौशल्यांच्या कमतरतेमुळे तरुणांचा मोठा वर्ग उत्पादनक्षम रोजगारात सामावू शकत नाही. त्यामुळे शिक्षण, कौशल्यविकास आणि नियामक सुधारणांवर तातडीने भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागेश्वरन यांनी ‘एआय’च्या विकासाची दिशा ठरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर असल्याचे स्पष्ट केले. ‘एआय’च्या धोरणनिश्चितीसाठी केंद्र सरकार सकारात्मक  पावले टाकत असल्याची ग्वाही नागेश्वरन यांनी  दिली. पण, तसे झाले नाही तर रोजगारक्षमतेवर मोठा परिणाम होण्याची भीतीही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.

 

नोकर्‍या जाण्याच्या भीतीबाबत ‘इन्फो एज’चे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी, बँकांमध्ये संगणक आल्यानंतरही रोजगार नष्ट न होता उत्पादकता वाढल्याचे उदाहरण दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेतून होणारे बदल स्वीकारणार्‍यांना ‘एआय’ फायदेशीर ठरेल, तर बदलांना विरोध करणार्‍यांना मागे टाकेल, असे नमूद केले.

या चर्चासत्रात, मायक्रोसॉफ्ट इंडिया व दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चांडोक म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता नोकर्‍या संपवणार नाही, तर त्या लहान-लहान कामांमध्ये विभागून कामकाजाची रचना बदलेल. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर ‘बुद्धिमत्ता निर्माण’ करणे शक्य होत आहे. सध्या भारत हा आधार ओळख प्रणाली व एकत्रित देयक प्रणालीप्रमाणेच (यूपीआय) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या टप्प्यावर उभा आहे.  भारतात माहिती-विदा साठवण केंद्रांच्या क्षमतेसाठी १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारांवर मोठा फटका बसण्याची शक्यता फेटाळली. उलट, ‘एआय’मुळे नव्या नोकर्‍या निर्माण होतील, असे कृष्णन म्हणाले. भारतातील ‘एआय’ व सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास दोन्हींबाबत जगभरात उत्सुकतेने पाहिले जात आहे. इंडिया सेमिकंडक्टर मोहिमेअंतर्गत मंजूर प्रकल्पांमुळे लवकरच देशात व्यावसायिक स्तरावरील  सेमिकंडक्टर उत्पादन सुरू होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘एआय’ परिवर्तनात देश आघाडीवर : मोदी

भारत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) परिवर्तनात जगामध्ये आघाडीवर असून, ‘एआय’ क्षेत्रातील भारताची प्रगती ही महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.  ‘इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो २०२६’चे उद्घाटन करण्यापूर्वी मोदी यांनी हे विधान केले.