पीटीआय, नवी दिल्ली वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागात निर्घृण पद्धतीने हत्या झालेल्या १६ वर्षीय मृत मुलीच्या कुटुंबीयांची भाजप, आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी सांत्वनासाठी भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मृत तरुणीच्या कुटुंबाला दिल्ली सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यावर टीकास्त्र सोडले. दिल्लीतील मुलींना दररोज िहसाचाराचा सामना करावा लागत आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. ते म्हणाले की, प्रत्येक वेळी अशा घटनानंतर जेव्हा सरकारला जबाबदार धरले जाते तेव्हा केजरीवाल आणि नायब राज्यपालांमध्ये दोष परस्परांवर ढकलण्याचा खेळ सुरू होतो. हे हत्याकांड ज्या भागात झाले, त्या भागातील म्हणजे वायव्य दिल्ली मतदारसंघाचे भाजपचे खासदार हंस राज हंस यांनी मृत मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांना आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली. याप्रकरणी आप राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपीला पोलीस कोठडी या हत्या प्रकरणातील आरोपी साहील याला मंगळवारी स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.