श्वेता मेनन हिचा विनयभंगाचा आरोप

अभिनेत्री श्वेता मेनन हिचा येथील एका कार्यक्रमात लोकप्रतिनिधीने विनयभंग केल्याचे वृत्त असून त्यावर मल्याळी चित्रपटसृष्टीत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. महिला संघटनांनीही या घटनेचा निषेध करून या राजकीय नेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विनयभंग करणाऱ्या राजकीय व्यक्तीचे नाव श्वेताने …

अभिनेत्री श्वेता मेनन हिचा येथील एका कार्यक्रमात लोकप्रतिनिधीने विनयभंग केल्याचे वृत्त असून त्यावर मल्याळी चित्रपटसृष्टीत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. महिला संघटनांनीही या घटनेचा निषेध करून या राजकीय नेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विनयभंग करणाऱ्या राजकीय व्यक्तीचे नाव श्वेताने उघड केले नसले तरी तिच्या म्हणण्यानुसार प्रेसिडेंट ट्रॉफी बोट रेसच्या काल सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.
काँग्रेसचे खासदार एन. पीतांबर कुरूप यांनी तिचा विनयभंग केला असल्याचे सांगण्यात येते. खासदार पीतांबर कुरूप यांनी या आरोपाचा इन्कार केला असून आपण असे कृत्य केले नाही असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमातही तिचा विनयभग केल्याची चित्रफित दाखवण्यात आली आहे.
श्वेता मेनन ही तिने केलेल्या आरोपावर ठाम आहे. कोची येथे तिने वार्ताहरांना सांगितले की, मला त्यांनी वाईट वागवले व काल जे घडले ते खरे आहे त्या म्हणण्यावर आपण माघार घेणार नाही. पोलिसांनी या प्रकरणी अजून गुन्हा दखल केलेला नाही, अभिनेत्री श्वेता मेनन हिने जिल्हाधिकाऱ्यांकडे तोंडी याबाबत तक्रार केली असून त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही.
मुख्यमंत्री ओमेन चँडी हे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे आहेत व माध्यमात नाव येताच आपण खुलासा केला आहे असे काँग्रेसचे कोल्लम लोकसभा मतदारसंघाचे खासदार कुरूप (वय ७३) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, आपले नाव दुर्दैवाने या प्रकरणात गोवले गेले व आपण निरपराध असल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे आहेत. राजकीय हेतून प्रेरित असा हा आरोप असावा कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकारणी या नात्याने अशा घाणेरडय़ा आरोपांमार्फत केलेल्या हल्ल्याचे आपल्याला फार वाईट वाटते.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य लिसी जोस यांनी आमचे पथक आता या प्रकरणी स्वत:हून दखल घेऊन कारवाई करील असे संकेत दिले आहेत.
मल्याळी चित्रपट कलाकार संघटनेने श्वेता मेनन हिच्या आरोपाचे समर्थन केले. तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता श्वेता म्हणाली की, आपण इनोसंट अंकल (अम्मा या संघटनेचे अध्यक्ष) यांच्याशी बोललो आहोत, जर काही कृती करणे गरजेचे असेल तर अम्मा या संघटनेच्या सल्ल्याने केली जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Politician molests swetha menon while sharing dais