नवी दिल्ली : राज्यसभेत एप्रिल ते जुलै या काळात निवृत्त होणाऱ्या ५९ सदस्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. “राजकारणात कोणताही पूर्णविराम नसतो, सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेरही निरंतर सुरू राहते,” असे निवृत्त सदस्यांना निरोप देताना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची प्रशंसा केली. “नवीन खासदारांनी या ज्येष्ठ सदस्याच्या समर्पणातून आणि प्रदीर्घ संसदीय अनुभवातून बोध घेतला पाहिजे,” असे मोदी म्हणाले.

मोदींनी उपसभापती हरिवंश आणि रामदास आठवले यांनाही निरोप दिला. यावेळी आठवले यांचे वर्णन मोदींनी, त्यांच्या विनोदी स्वभावासाठी ओळखले जाणारे एक ‘सदाबहार व्यक्तिमत्त्व’ असे केले. शरद पवार व रामदास आठवले यांची बिनविरोध निवड झाल्याने ते पुन्हा राज्यसभेचे सदस्य होतील. खरगेंचा कार्यकाळ जूनमध्ये संपत असला तरी त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेही राज्यसभेत परत येतील असे मानले जाते.

प्रेम आमच्याशी, लग्न मोदीसाहेबांशी!

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “राजकारण आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असणारे लोक देशाची सेवा करण्याच्या ध्येयवेडेपणामुळे कधी थकत नाहीत वा निवृत्तही होत नाहीत.” खरगेंनी यावेळी वैयक्तिक आठवणही सांगितली. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यावर खरगेंनी मिश्किल टिप्पणी केली, “त्यांनी प्रेम आमच्यावर केले. पण, लग्न मात्र मोदी साहेबांशी केले.” खरगेंच्या या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला!

यांना संधी नाहीच

महाराष्ट्रातून भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फौजिया खान, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील हे पाचही सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही. बिहारमधून पायउतार होणारे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभेचे सदस्य असतील, पण, त्यांच्या पक्षाचे नेते व उपसभापती हरिवंश यांना उमेदवारी न दिल्याने त्यांना राज्यसभेतून निवृत्त घ्यावी लागणार आहे.

या राजकीय प्रवासात काही कडू आणि गोड अनुभवही येतात. पण, असा एखादा प्रसंग उद्भवतो तेव्हा आपण पक्षीय भेद बाजूला ठेवतो. आपल्या सर्वांमध्ये एक समान भावना निर्माण होते ती म्हणजे आपले सहकारी आता इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी पुढे जात आहेत. नरेंद्र मोदी, पंतप्रधान.