केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी युतीच्या राजकारणाबद्दल बोलताना राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, ते रसायनशास्त्र आहे, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे की भाजपा पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल. उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही, असे अमित शाहांनी स्पष्टपणे सांगितले.

हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिटमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राजकारण हे भौतिकशास्त्र नसून रसायनशास्त्र आहे. युतीमुळे भाजपाचे नुकसान होणार नाही आणि पक्षाचा विजय होईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, रसायनशास्त्र आहे

भारतीय समाज पक्ष आणि अखिलेश यांचा समाजवादी पक्ष यांच्यातील युती आणि सत्ताविरोधी प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “युतीच्या मतांचे गणित प्लस-मायनस करणे योग्य नाही. राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, रसायनशास्त्र आहे. दोन पक्ष एकत्र आल्यावर दोघांच्या मतांची बेरीज होईल, जी इतकी वाढेल, हा हिशोब माझ्या मते योग्य नाही. जेव्हा दोन रसायने मिसळतात तेव्हा फक्त तिसरे रसायन तयार होते आणि ते आपण आधीच पाहिले आहे.”

“भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची सुटका केली”; उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

भाजपा उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होईल

“यापूर्वी सपा आणि काँग्रेसची युती असतानाही ते असेच म्हणायचे. जनता जागरूक झाली आहे. मी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आलो आहे, मला तुमच्या व्यासपीठावरून मोठ्या आत्मविश्वासाने सांगायचे आहे की भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होईल. मी काशी, गोरख, अवध, कानपूर आणि सर्व पश्चिम भागात जाऊन आलो आहे. भाजपा खूप मजबूत असून हा पक्ष प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकणार आहे,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

“तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं”, न्यूज अँकरच्या आरोपांवर योगी आदित्यनाथ म्हणतात…!

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शेतकरी आंदोलनाचा परिणाम होईल का?

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शेतकरी आंदोलनाचा परिणाम होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाचा प्रभाव पूर्वीही कमी होता, पण आता काही कारण नाही कारण मोदींनी शेतीविषयक कायदे मागे घेऊन बाकीचे कारण संपवले आहे.

२०१४ नंतर भारतात स्थिर सरकार

“२०१४ नंतर भारताने स्थिर सरकार पाहिले. त्यापूर्वी भारत ‘पॉलिसी पॅरालिसिस’च्या स्थितीत होता. भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. प्रत्येक मंत्र्याला वाटत होते की आपण पंतप्रधान आहोत. पंतप्रधान मोदींनी संयम आणि नियोजनाने अनेक प्रश्न यशस्वीरित्या सोडवले आहेत,” असे अमित शाह म्हणाले.

दरम्यान, पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, “आम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशीही बोलत आहोत. कदाचित आमची युती असेल. शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा प्रश्न आहे, तर पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आणि आंदोलन संपवण्यास सांगितले. पंजाबमध्ये मत विकासावर मिळेल आणि ज्याची कामगिरी चांगली असेल तोच निवडणूक जिंकेल.”