scorecardresearch

‘सरदार पटेल, नेताजी, शास्त्री, आंबेडकर, भगतसिंह आमचेच!’  

सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह अशा प्रतिभावान राष्ट्रपुरुषांवर काँग्रेसचा ‘हक्क’ असल्याचा संदेश ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिरांच्या निमित्ताने भाजपला दिला आहे.

UP Elections Results 2022 yogi adityanath will create history by breaking these several record

महेश सरलष्कर

उदयपूर : सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह अशा प्रतिभावान राष्ट्रपुरुषांवर काँग्रेसचा ‘हक्क’ असल्याचा संदेश ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिरांच्या निमित्ताने भाजपला दिला आहे.

  भाजपप्रणित केंद्र सरकारच्या वतीने वर्षभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून अनेक स्वातंत्र्यसेनानींना भाजपच्या वतीने अभिवादन केले गेले. आता मात्र सरदार पटेल वा नेताजी बोस यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांवर भाजपने दाखवलेल्या ‘स्वामित्वा’ला आव्हान देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. उदयपूरमध्ये अनेक ठिकाणी भाजपने ‘आपले’ मानलेल्या राष्ट्रपुरुषांच्या विधानांचे फलक काँग्रेसने लावले आहेत, त्यातून त्यांची काँग्रेस विचारसरणी मांडलेली आहे. चिंतन शिबीर होत असलेल्या ‘ताज अरावली’ या पंचतारांकित हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावरही हे मोठमोठे फलक दुतर्फा दिसतात.

‘‘स्वतंत्र आणि अखंड भारत हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे’’, या नेताजींच्या विधानासह गुरुदेव रवीद्रनाथ टागोरांच्या, ‘‘आपण एकाच देशाचे आहोत व एकत्रच असू याची जाणीव काँग्रेसने करून दिली’’, हे विधान फलकावर दिसते.  ‘‘राज्यांनाही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे काँग्रेस मानते आणि संपूर्ण भारतात त्याची प्रचिती येते. राज्ये ही भारताचे अविभाज्य अंग आहेत असेही काँग्रेस मानते’’, हे पटेलांचे विचार फलकावर उद्धृत केले आहेत. त्याच फलकावर, ‘‘आपल्याला काँग्रेसचे अधिकाधिक लोकशाहीकरण केले पाहिजे’’, असे पं. नेहरूंचे विचारही  आहेत. भाजपने प. बंगाल  विधानसभा निवडणुकीत टागोर,  बोस यांना ‘आपले’ मानले.  पटेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोपही केला होता.  लाला लाजपत राय, सरोजनी नायडू, मौलाना आझाद आदींचे विचार  काँग्रेसने  जाणीवपूर्वक उद्धृत केले आहेत. ‘‘काँग्रेस खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’’, या नरसिंह रावांच्या विधानांसह, ‘‘लोकशाहीला धोका पोहोचेल असे कृत्य करण्याची मुभा कोणालाही देता येऊ शकत नाही’’, हे मनमोहन सिंग यांचे विचार एकाच फलकावर मांडलेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Politics sardar patel netaji shastri ambedkar bhagat singh are ours congress party rights ysh