प्रशांत किशोर यांनी शरद पवारांनंतर घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय चर्चांना उधाण!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.

prashant kishor meets rahul gandhi
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लागोपाठ दोनदा भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर आता थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील हजर होती. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नेमकं प्रशांत किशोर यांचं चाललंय काय? याविषयी तर्त वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज राहुल गांधींसोबत झालेली भेट ही आगामी पंजाब विधानसभा निवडणुका आणि पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर झाल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या महिन्याभरात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कपूरथला हाऊस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

 

पंजाबात धुमसती काँग्रेस – वाचा सविस्तर

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामधील मतभेद विकोपाला गेल्याचं बोललं जात आहे. याचसंदर्भात गेल्या आठवड्यात नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि नंतर त्यांच्यासोबत राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेला हा कलह पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतो. याचसंदर्भात प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह: नवज्योतसिंग सिद्धूंनी घेतली प्रियंका गांधींची भेट

दरम्यान, प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख हरीश रावत यांनी माहिती दिली आहे. “राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे अनेक नेते त्यांची भेट घेऊन आपली मतं त्याना सांगत असतात. ते वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेत असतात. प्रशांत किशोर पंजाबसंदर्भात बोलण्यासाठी त्यांना भेटलेले नाहीत”, अशी माहिती हरीश रावत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

बादल म्हणतात, “सिद्धू हे भरकटलेलं मिसाईल!”

सध्या नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये असून त्यांचं नाव पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे. पंजाबमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चा जोर धरू लागलेल्या असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना आत्तापासूनच लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी “नवज्योतसिंग सिद्धू हे एक भरकटलेलं मिसाईल आहे. या मिसाईलवरचं नियंत्रण सुटलेलं आहे. हे मिसाईल कुठल्याही दिशेने जाऊ शकतं. ते स्वत:वरही आघात करू शकतं. आज पंजाबला अभिनय करणाऱ्या व्यक्तीची नसून राज्याच्या विकासाविषयी विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे”, अशा शब्दांत नुकतीच नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poll strategist prashant kishor meets rahul gandhi on punjab congress conflict priyanka gandhi present pmw

ताज्या बातम्या