polling stations voting in the second phase Gujarat Assembly Elections ysh 95 | Loksatta

दुसऱ्या टप्प्यात ५८.८० टक्के मतदान; गुजरात विधानसभा निवडणूक

९३ जागांसाठी हे मतदान झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुसऱ्या टप्प्यात ५८.८० टक्के मतदान; गुजरात विधानसभा निवडणूक
दुसऱ्या टप्प्यात ५८.८० टक्के मतदान

पीटीआय, अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ५८.८० टक्के मतदान झाले. ९३ जागांसाठी हे मतदान झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला. काही अनुचित घटना सोडल्यास अनेक मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

१८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ८९ मतदारासंघांसाठी ६३.३१ टक्के मतदान झाले, तर सोमवारी दुसऱ्या टप्प्यात ५८.५० टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात गुजरातच्या उत्तर आणि मध्य भागांतील १४ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवरून डाटा संकलित करण्यास वेळ लागत असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या संख्येत पोस्ट मतपत्रिकांचा समावेश नाही.

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदन गढवी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुखराम राठवा यांसह अनेक पक्षांचे मातबर नेत्यांनी मतदान केले. पंतप्रधानांनी अहमदाबाद शहरातील राणीप भागातील निशान शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तर शहा यांनी अहमदाबाद शहरातील नारनपुरा परिसरातील महापालिका केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

साबरकांठा जिल्ह्यात सर्वाधिक ६५.८४ टक्के मतदान झाले. अहमदाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५३.५७ टक्के मतदान झाले. बडोदा जिल्ह्यात ५८ टक्के मतदान झाल्याचे माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या मतदानाद्वारे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासह ८३२ उमेदवारांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. या मतदानाचा निकाल गुरुवार, ८ डिसेंबर रोजी लागणार आहे.

मतदान यंत्रात बिघाड अनेक ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यांत बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या. त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे, असे आयोगाने म्हटले आहे. मतदानाच्या सुरुवातीच्या तासांमध्ये बिघाड झाल्यामुळे ४१ बॅलेट युनिट, ४० कंट्रोल युनिट आणि १०९ व्हीव्हीपीएटी बदलण्यात आल्याचे आयोगाने सांगितले. पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील काँग्रेस उमेदवार प्रभातसिंह चौहान यांनी आरोप केला आहे की, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनाचे नुकसान केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST
Next Story
‘यूएपीए’अंतर्गत समान आरोपांमुळे उमर, सैफीच्या सुटकेचा निर्णय