Ponda Bypoll Cancelled by Bombay High Court: महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असताना गोव्यातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने फोंडा पोटनिवडणूक रद्द केली आहे. मतदानासाठी केवळ एक दिवस बाकी असताना न्यायालयाने निवडणूकच रद्द केल्याने निवडणुकीची सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे ०९ एप्रिल रोजी होणारी मतदान प्रक्रिया आता होणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला देखील मोठा धक्का बसला आहे.
तांत्रिक मुद्यांवर युक्तिवाद
कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. या जागेसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पण, एक वर्षांच्या कार्यकाळाचा मुद्दा उपस्थित करत याचिकाकर्त्या अंकिता कामत आणि प्रीतम हरमलकर यांनी न्यायालयात धाव घेतली. लोकप्रतिनिधी कायद्यातील तांत्रिक मुद्यांवर याचिकाकर्त्यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.
न्यायालयात काय युक्तिवाद झाला?
“निवडून आलेल्या नव्या सदस्याचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी राहिला असेल तर निवडणूक घेण्याची गरज नसते”, असे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १५१ -ए सांगतो. याचाच आधार घेत याचिकाकर्त्या अंकिता कामत आणि प्रीतम हरमलकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत फोंड्याची निवडणूक मतदानाच्या १६ तास अगोदरच रद्द केली. राज्याचे महाधिवक्त देविदास पांगम यांनी देखील कायदेशीर तत्वावर बोट ठेवत लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ शपथविधीपासून सुरु होते, असे स्पष्ट केले.
निर्णयानंतर नाराजीचा सूर
गोवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी याबाबत निर्णय देताना पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द केली. या निर्णयानंतर काँग्रसने निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली. आयोग आणि भाजपाचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी करताना राज्याच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसकडून येथे केतन भाटीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
फडणवीसांनी प्रचारासाठी लावली होती हजेरी
भाजपाने फोंडा जागेसाठी रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिली होती. नाईक यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. बारामतीत सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला त्याच दिवशी फडणवीस नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्यात होते. रवी नाईक यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली होती. पण, युतीत असेल्या महाराष्ट्रात गोमंतकवादी पक्षाला रामराम ठोकून केतन भाटीकर यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
