Pooja Khedkar in Delhi Highcourt : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. दि ट्रब्युनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इतर मागासवर्ग आणि अपंगत्व कोट्यातून पूजा खेडकर यांनी युपीएससची परीक्षा दिली होती. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हेही वाचा >> पिंपरी : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव… पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात काय म्हटलं? "मी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यायला तयार आहे. आधी ते म्हणाले की मी नाव बदलंल. आता ते म्हणतात की माझं अपंगत्व संशयास्पद आहे. मी एम्समध्ये जाण्यास तयार आहे", असं पूजा खेडकरच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. दिल्ली कोर्टाने पूजाच्या १० दिवसांची कोठडी मागितली होती. पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्याकरता तथ्य लपवल्याचा आरोप दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला. परंतु, दिल्ली पोलिसांनी कोठडीत चौकशीची विनंती केली नसल्याचा प्रतिवाद पूजाच्या वकिलांनी केला. तसंच, आवश्यक नोंदी आधीच अधिकाऱ्यांना दिले असल्याचंही त्यांनी म्हटलं. हेही वाचा >> Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात आणखी एक गुन्हा; लेकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घातलेला वाद अंगाशी! पूजा खेडकर यांच्यावर जुलै महिन्यात यूपीएससीनं मोठी कारवाई केली. पूजा खेडकर यांना आयएएस म्हणून देण्यात आलेली उमेदवारी (Provisional Candidature) यूपीएससीनं रद्द केली. त्याचबरोबर, इथून पुढे होणाऱ्या यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेत बसण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी सेवेत निवड होताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी चुकीचे क्रीमी लेअर प्रमाणपत्र व दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याशिवाय, त्यांनी किती वेळा परीक्षा दिली, याबाबतही चुकीची माहिती यूपीएससीकडे सादर केल्याचाही खुद्द यूपीएससीचा दावा आहे. यासंदर्भात पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.