ती गाडी रेल्वे राज्यमंत्र्यांसाठी असल्याने औचित्याचा प्रश्न नसल्याचे रेल्वेचे स्पष्टीकरण
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील बिना जिल्ह्य़ातून भोपाळपर्यंत विशेष रेल्वेने प्रवास केल्याबद्दल औचित्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पूनम महाजन यांना विशेष वागणूक देण्यात आल्याचा रेल्वेने इन्कार केला असून ती गाडी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्यासाठी पाठविण्यात आली होती असे म्हटले आहे.
रेल्वे राज्यमंत्र्यांसाठी ३१ मे रोजी राजशिष्टाचारानुसार भोपाळहून सागर जिल्ह्य़ात विशेष गाडी पाठविण्यात आली होती ही वस्तुस्थिती असल्याचे पश्चिम-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रमेश चंद्र यांनी सांगितले. सागर जिल्ह्य़ात एका कार्यक्रमासाठी सिन्हा गेले होते आणि त्या कार्यक्रमाला पूनम महाजनही उपस्थित होत्या. तेथून सिन्हा आणि महाजन विशेष गाडीने बिना येथे आले आणि तेथे सिन्हा यांच्या हस्ते रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले, असे रमेश चंद्र म्हणाले.
या कार्यक्रमानंतर सिन्हा विशेष गाडीने भोपाळला जाणार होते आणि तेथून ते दिल्लीला जाणारे विमान गाठणार होते, मात्र कार्यक्रमाला विलंब झाल्याने सिन्हा यांनी ऐन वेळी कार्यक्रम बदलला आणि त्यांनी बिनाहून दिल्लीला जाणारी गाडी पकडली, असे महाव्यवस्थापनक म्हणाले.
विशेष गाडी भोपाळला जाणार असल्याने पूनम महाजन यांनी ती गाडी पकडली, त्यामुळे त्यामधून अन्य कोणताही अर्थ काढला जाऊ नये, हा केवळ योगायोग होता, असेही ते म्हणाले. रेल्वेच्या नियमानुसार खासदारांसाठी कोणतीही विशेष गाडी चालविण्यात येत नाही. पूनम यांना विशेष वागणूक देण्यात आल्याच्या आरोपाचा रमेश चंद्र यांनी इन्कार केला. नियमाच्या विरुद्ध जाऊन महाजन यांना कोणतीही विशेष वागणूक देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.