जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून (LoC) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या सुरुंग स्फोटात लष्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुख कमांडरसह चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमधील सतवाल नाकी परिसरात हा स्फोट झाला. या स्फोटात चार दहशतवादी ठार झाले आहेत.

मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद फैजान याचा समावेश आहे. तसेच मोहम्मद फैजानसह आणखी तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून त्या ठिकाणी सुरुंग ठेवण्यात आलेले होते. नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करताच या भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि त्यात चारही घुसखोर जागीच ठार झाले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, या चारही दहशतवाद्यांची ओळख मोहम्मद इश्तियाक, मोहम्मद फैजान, वकास आणि असीम अशी पटली आहे. ही घटना सोमवारी पुंछ जिल्ह्यातील सतवाल-नाकी परिसरात घडली आहे. या भागात घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेवर कडक पहारा तैनात केला आहे. स्फोटाची घटना घडल्यानंतर आता सुरक्षेबाबत अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांचा हा गट सोमवारी सतवाल-नाकी परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्या दरम्यानच ते सुरुंगांनी भरलेल्या परिसरात पोहोचले आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात चारही दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आता सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देत नियंत्रण रेषेवरील निगराणीमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे.