पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘मागील सरकारच्या काळात म्हणजे २०१४ पूर्वी प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते. त्यामुळे देशातील गरीब व मध्यमवर्गाला खूप झळ पोहोचली,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली. आमचे सरकार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वदूर शेवटच्या लाभार्थीपर्यंत सरकारची मदत, सेवा प्रभावीपणे पोहोचवत आहे. त्यासाठी स्वयंचलित हवाई तंत्रज्ञानाचा (ड्रोन) वापरही सरकार करत आहे, असेही मोदींनी सांगितले.

दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘भव्य ड्रोन महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी केल्यानंतर ते येथील मेळाव्यास संबोधत होते. मोदी म्हणाले, की भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वाकडे स्मार्टफोन असावा, प्रत्येक शेतासाठी ‘ड्रोन’ असावा व प्रत्येक घरात समृद्धी नांदावी, असे माझे स्वप्न आहे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या वापराविषयी भारतात उत्साही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रोजगाराचे एक नवे दालन उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आठ वर्षांपूर्वी आम्ही ‘किमान सरकार आणि कमाल प्रशासन’चा मार्ग अवलंबत सुप्रशासनाची अंमलबजावणी सुरू केली. राहणीमान सुलभता आणि व्यवसायातही सुलभतेस प्राधान्य देण्यात आले. मात्र, तंत्रज्ञान एक समस्या असल्याचा आधीच्या सरकारांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे तंत्रज्ञानाला ‘गरीबविरोधी’ स्वरूप देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला. त्यामुळे २०१४ आधी तंत्रज्ञानाच्या वापराविषयी प्रशासनात उदासीनता होती. त्यामुळे गरजवंत-गरीब, वंचित घटक आणि मध्यमवर्गीयांना याची मोठी झळ बसली.

आधी तंत्रज्ञानाचा उपयोग मोजक्या उच्चभ्रू अभिजनांसाठीच असतो, असा समज होता, असे सांगून मोदी म्हणाले, मात्र आमच्या सरकारने नवतंत्रज्ञानाचे पहिले लाभार्थी बहुजन गरजवंत ठरतील यावर भर दिला. तसे यशस्वी प्रयत्न केले. ‘ड्रोन तंत्रज्ञान’ हे त्यापैकीच एक उदाहरण आहे.  शेवटच्या लाभार्थीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे, अशा तंत्रज्ञानांमुळे सहज शक्य झाले . ‘ड्रोन तंत्रज्ञान’ मोठय़ा क्रांतीचा पाया ठरण्याचे मोठे उदाहरण म्हणजे ‘पंतप्रधान स्वामित्व योजना’ आहे. त्याअंतर्गत ‘ड्रोन’च्या साहाय्याने प्रथमच गावा-गावांतील प्रत्येक स्थावर मालमत्तेची मोजणी अद्ययावत तंत्रज्ञानाने ‘डिजिटली’ केली गेली. त्याद्वारे ६५ लाख अद्ययावत स्थावर मालमत्ता कार्ड (डिजिटल प्रॉपर्टी कार्ड) वितरित करण्यात आली.  ‘ड्रोन’चा वापर कृषी, क्रीडा, संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या क्षेत्रांत प्रभावीपणे करता येईल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या वापराविषयी बरेच निर्बंध होते. केंद्र सरकारने अल्प कालावधीत बरेच निर्बंध हटवले आहेत, अशी माहितीही मोदींनी दिली.

‘स्वस्त धान्य दुकानांसमोरील रांग हटवली!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सुप्रशासन आणि दैनंदिन जीवनातील व्यवहार सुलभ होतील. ‘ड्रोन’च्या रूपाने एक बहुपयोगी ‘स्मार्ट’ साधन आपल्याला मिळाले आहे. नागरिकांच्या जीवनाचा ते अविभाज्य अंग होणार आहे. एक काळ असा होता, की स्वस्त धान्य दुकानांसमोर जनतेची रांग लागलेली असायची. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे आम्ही या प्रकारच्या अडचणी दूर केल्या आहेत.