वृत्तसंस्था, बर्सिलोना (स्पेन) : पॉप गायिका शकिरा हिच्या विरोधात करचुकवेगिरीच्या आरोपाखाली खटला चालविण्यासाठी स्पेनमधील न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. शकिराने २०१२ ते २०१४ दरम्यान जे उत्पन्न मिळविले, त्यावरील १४.५ दशलक्ष युरो इतका कर तिने भरलेला नाही, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. तिने ही करचोरी केल्याचे सिद्ध झाले तर, आठ वर्षे तुरुंगवास आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ४५ वर्षीय शकिराने मात्र हा आरोप फेटाळून लावला असून आपण कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे खटला टाळण्यासाठी कर विभागाशी तडजोड करण्यास तिने नकार दिला आहे. तिच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या संस्थेने सांगितले की, तिने आतापर्यंत कराचा संपूर्ण भरणा केला असून त्याशिवाय तीन दशलक्ष युरो हे व्याजापोटीही अदा केले आहेत. हे प्रकरण बर्सिलोनानजीकच्या एस्पुगेस दा लोब्रेगाट शहरातील न्यायालयात आहे. या न्यायालयाने म्हटले आहे की, तिने सहा वेळा कर चुकविल्याचा आरोप आहे.