३५ वर्षांच्या एका पॉर्न पाहण्याची सवय जडलेल्या माणसाने त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची हत्या केली. १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने बलात्काराचा प्रयत्न होत असताना तिच्या वडिलांना प्रतिकार केला. त्यानंतर या नराधमाने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी या माणसाला अटक केली.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या माणसाला अटक करण्यात आली त्याला पॉर्न फिल्म पाहण्याची सवय जडली आहे. त्याने त्याच अंमलाखाली हा गुन्हा केला. पोलिसांना या प्रकरणी कॅमेराचं फूटेजही मिळालं आहे. आरोपी आणि त्याची मुलगी जंगलात चालताना दिसत आहेत. त्यानंतर त्याने हा गुन्हा केला. हैदराबादच्या मियापूर या ठिकाणी ही घटना घडली. सुरुवातीला आरोपीने त्याची मुलगी हरवली आहे अशी तक्रार केली होती. या सगळ्याचा बनाव त्याने रचला होता. १४ मे रोजी या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाल्याचंही पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. त्यात जंगलापर्यंत आरोपी आणि त्याची मुलगी आल्याचं दिसून आलं. मियापूरचे एसीपी पी. नरसिंह राव यांनी यांनी सांगितलं की हे कुटुंब मूळचं मेहबुबनगर येथील आहे. या मुलीची आई रोजंदारीवर काम करते. या मुलीच्या आईने हे सांगितलं होतं की ७ जूनच्या सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान या मुलीने घर सोडलं. मला या घरात रहायचं नाही असं ही मुलगी म्हणाली होती. त्यानंतर या मुलीच्या नातेवाईकांनी या मुलीबाबत मुलीच्या वडिलांना कळवलं. त्यानंतर हा आरोपी बाईकवरुन तातडीने जंगलाच्या दिशेने गेला. त्याने बाईक थांबवली आणि त्याच्या मुलीसह जंगलात आतपर्यंत चालत गेला.

हे पण वाचा- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, यवतमाळच्या वणी तालुक्यातील संतापजनक घटना

मुलीच्या चेहऱ्यावर वार करुन हत्या

जंगलात बरंच आतमध्ये गेल्यानंतर आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर या मुलीने प्रतिकार केला आणि मी घडला प्रकार आईला सांगेन. यानंतर घाबरलेल्या आरोपीने तिच्यावर वार केले. त्यानंतर तिची शुद्ध हरपली, मात्र तिचा जीव जाईपर्यंत तो वार करत राहिला. त्यानंतर तिला तशाच अवस्थेत टाकून तो घरी गेला. त्याने कपडे बदलले आणि पुन्हा या ठिकाणी आला. मुलगी मेली आहे का? हे त्याने तपसालं त्यानंतर तो बायको ज्या ठिकाणी रोजंदारी करते तिथे गेला आणि मुलगी हरवल्याचं तिला खोटंच सांगितलं. ज्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

मुलीच्या बापाला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी असंही सांगितलं की मुलीचा तपास लागला का? हे विचारण्यासाठी आरोपी वारंवार पोलीस स्टेशनला चकरा मारत होता. तसंच तो मुलीचा शोध लागला पाहिजे, माझी मुलगी कुठे असेल? असं विचारत रडत होता अशी माहिती या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने दिली. पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं. ज्यानंतर या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.