बेलफास्ट, लिव्हरपूल येथील विद्यापीठांचे संशोधन
कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, आता पॅरिसमधील हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जन कुणी किती कमी करायचे यावर तू-तू-मैं-मैं होईल, पण प्रत्यक्षात हे उत्सर्जन वातावरणात पसरू नये यासाठी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यांनी एका सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते, परिणामी ते वातावरणात मिसळत नाही. सच्छिद्रतेचा गुणधर्म असलेला द्रव जगात प्रथमच तयार करण्यात आला आहे.
ब्रिटनमधील बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठ व लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी हा नवीन द्रव शोधून काढला आहे. त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू विरघळवता येतात. हे वायू द्रवाच्या सच्छिद्रता गुणधर्मामुळे शोषले जातात. अनेक पर्यावरण स्नेही रासायनिक प्रक्रिया यातून शोधता येतील. सध्या कार्बन पकडून तो समुद्राच्या तळाशी गाडला जातो, त्याला कार्बन सिक्वेट्रेशन असे म्हणतात त्यापेक्षा तो सच्छिद्र द्रवाने पकडता येत असेल तर ते जास्त फलदायी आहे. जीवाश्म इंधनांमुळे कार्बन व हरितगृह वायूंची निर्मिती होत असते, पण हे वायू या सच्छिद्र वायूने शोषून घेता येतात. ज्या पदार्थात निसर्गत: सच्छिद्रता असते त्यांचा उपयोग सध्या प्लास्टिकपासून पेट्रोलपर्यंत अनेक पदार्थ तयार करण्यासाठी होतो, असे क्वीन्स स्कूल ऑफ केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनीयरिंग या संस्थेचे स्टुअर्ट जेम्स यांनी म्हटले आहे.
अगदी आतापर्यंत हे सच्छिद्र पदार्थ हे घन रूपात होते. झिओलाईट हे त्याचे एक उदाहरण, पण रेणूंचे काही आकार तयार करून सर्वच जागा व्यापणार नाही असा द्रव तयार करता येतो. त्यामुळे तो द्रव सच्छिद्र असतो. त्या छिद्रांमुळे हरितगृह वायू द्रवात सामावले जातात. हा द्रव नवीन प्रकारचा असून त्याचा हा उपयोग अभिनव आहे.
विशिष्ट प्रकारच्या कार्बनी रेणूची पिंजऱ्यासारखी रचना व द्रावक घटक वापरून सच्छिद्रता असलेला द्रव पदार्थ जगात पहिल्यांदा तयार करण्यात आला आहे. आणखी काही वर्षांच्या संशोधनानंतर त्याचा वापर हरितगृह वायू पकडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात करता येईल, त्यांची वायू सामावण्याची क्षमता वाढवता येईल असे त्यांनी सांगितले. ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.