अबब! पोलिसांनी जप्त केलेली कार परत मिळण्यासाठी भरला २७.६८ लाखांचा दंड

दंडाची रक्कम भरल्यानंतर कार मालकाच्या हवाली करण्यात आली

गुजरातमध्ये एका व्यक्तीने पोलिसांनी जप्त केलेली आपली कार मिळवण्यासाठी तब्बल २७.६८ लाखांचा दंड भरला आहे. यामध्ये थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही समावेश आहे. योग्य कागदपत्रं नसल्याने पोलिसांनी पोर्शे ९११ कार जप्त केली होती. कारचे मालक रणजीत देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात दंडाची रक्कम भरल्यानंतर कार त्यांच्या हवाली करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी कार जप्त केली होती.

अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आरटीओच्या पावतीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कारमालकाला २७.६८ लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. देशात पहिल्यांदाच इतका मोठा दंड वसूल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“योग्य कागदपत्रं नसल्याने वाहतूक पोलिसांनी कार जप्त केली होती. यासाठी आरटीओने २७.६८ लाखांचा दंड ठोठावला. देशात आतापर्यंत ठोठावण्यात आलेली दंडाची ही सर्वात मोठी रक्कम आहे,” असं पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. हेलमेट क्रॉसरोड येथे २८ नोव्हेंबर रोजी नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी कार जप्त केली.

चालकाकडे चौकशी केली असता योग्य कागदपत्रं सादर करु न शकल्याने कार जप्त करण्यात आली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. “यामुळे आम्ही कार जप्त करत मोटार वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला होता. याचा अर्थ चालकाने आरटीओकडे दंडाची रक्कम जमा करावी आणि कार परत मिळवण्यासाठी पावती घेऊन हजर राहावं,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सुरुवातीला चालकाला ९.८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण जेव्हा कारमालक दंडाची रक्कम भरण्यासाठी पोहोचले तेव्हा आरटीओने जुना रेकॉर्ड पाहिला आणि दंडाची रक्कम २७.६८ लाखांपर्यंत पोहोचली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Porsche owner pays rs 27 68 lakh penalty ahmedabad sgy

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या