Portuguese Girl India Travel Experience : पोर्तुगालची २४ वर्षीय ॲना सध्या भारतात सोलो ट्रॅव्हल करत असून, ती हिचहायकिंगच्या माध्यमातून देशभर प्रवास करत आहे. भारतात येण्यापूर्वी तिला छळ, चोरी आणि पुरुषांच्या टक लावून पाहण्याबाबत अनेकांनी सावध केकेले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिने एकटीने हिचहायकिंग करणंही टाळले. मात्र, भारतातील अनुभवाने तिचा दृष्टिकोन बदलल्याचं तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

‘भारतीय पुरुषांपासून सावध राहा’

ॲनाने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात एका सुंदर ठिकाणच्या तिच्या फोटोने होते. त्यावर, “तू एकटी भारतात जाणार आहेस? पुरुषांपासून सावध राहा,” असा मजकूर दिसतो. यानंतर व्हिडीओमध्ये भारतातील तिच्या प्रवासादरम्यान भेटलेल्या पुरुषांबरोबरचे विविध क्षण पाहायला मिळतात. काही जण तिच्याबरोबर डान्स करताना, तर काही तिची थट्टामस्करी करताना दिसतात. एका व्यक्तीने तिच्या बुटाची लेस बांधून दिली, तर दुसऱ्याने तिच्याबरोबर लुडो खेळल्याचंही व्हिडीओमध्ये दिसते.

‘माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला’

भारतामध्ये येण्यापूर्वी तिला छळ, चोरी आणि नको असलेलं लक्ष याबाबत सावध करण्यात आलं होतं. त्यामुळे सुरुवातीला ती घाबरली होती आणि पहिल्या महिन्यात तिने हिचहायकिंग करणे पूर्णपणे टाळले. मात्र, प्रवासादरम्यान अनेक लोकांनी अनपेक्षितपणे मदत केल्याचे ॲनाने सांगितले. एका फोनच्या समस्येवर मदत करण्यासाठी अनोळखी व्यक्तींनी तब्बल दोन तास दिले. काही लोकांशी पुढे तिची मैत्रीही झाली. “मी भेटलेल्या पुरुषांनी माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला,” असे ॲनाने म्हटले.

‘भारत पूर्णपणे सुरक्षित आहे असं म्हणत नाही’

आपल्या अनुभवावरून भारत पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा आपण करत नसल्याचे ॲनाने स्पष्ट केले. एकट्या महिला प्रवाशांनी, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे तिने म्हटले. तसेच, इतर महिलांना आलेल्या वाईट अनुभवांना कमी लेखण्याचा आपला उद्देश नसल्याचेही तिने स्पष्ट केले. मात्र, भीतीमुळे भारतातील चांगले अनुभव घेण्यापासून स्वतःला रोखू नये, असा संदेश तिने दिला.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

ॲनाच्या पोस्टवर भारतीय युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने भारतातील सकारात्मक बाजू दाखवल्याबद्दल तिचे आभार मानले. तर दुसऱ्या युजरने तिच्या चांगल्या अनुभवांचे स्वागत करताना, तिला मिळालेले सुरक्षेबाबतचे इशारे पूर्णपणे निराधार नसल्याचे सांगत सावध राहण्याचा सल्ला दिला.

ॲनाच्या या पोस्टमुळे भारतातील प्रवास, सुरक्षितता आणि अनोळखी लोकांकडून मिळणारी मदत याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या तिचे मोठे ध्येय पोर्तुगालपासून हिचहायकिंग करत ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचण्याचे आहे. भारत आणि नेपाळचा प्रवास हा त्याच प्रवासाचा एक भाग आहे.