Iran Nuclear Attack Mohammad Safa UN Resignation: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारून आता महिना लोटला आहे. तरीही अद्याप युद्धातून मार्ग निघालेला नाही. ड्रोन्स, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आता संभाव्य जमिनीवरील युद्ध सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच संयुक्त राष्ट्रांचे राजनयिक आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे संयुक्त राष्ट्रांमधील दीर्घकाळ प्रतिनिधी असलेल्या मोहम्मद सफा यांनी एक गंभीर आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराची तयारी करत असल्याचा आरोप करत सफा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मोहम्मद सफा जवळपास १२ वर्षे संयुक्त राष्ट्रांमध्ये पीव्हीएचे मुख्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांनी एक्सवर दोन पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. “संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये संभाव्य अण्वस्त्र वापराची तयारी करत असताना आपण याचे साक्षीदार होऊ इच्छित नाही”, असे सफा यांनी म्हटले आहे.
मोहम्मद सफा यांनी इराणची राजधानी तेहरानचा एक फोटो एक्सवर शेअर करत पोस्टमध्ये म्हटले की, लोकांना अजूनही याचे गांभीर्य कळलेले नाही. हा तेहरानचा फोटो आहे. तुमच्यासारख्या अशिक्षित, कधीही प्रवास न केलेल्या, सैन्यात सेवा न दिलेल्या आणि बॉम्ब फेकण्याच्या विचाराने तोंडाला पाणी सुटणाऱ्या लोकांसाठी हे शेअर करत आहे.
“तेहरान काही कमी लोकसंख्येचे शहर नाही. इथे असंख्य कुटुंबे, मुले, पाळीव प्राणी आहेत. स्वप्न पाहणारी सामान्य कष्टकरी लोक आहेत. मात्र तुम्हाला विकृत युद्धज्वर आहे. तेहरान जवळपास १ कोटी लोकसंख्येचे शहर आहे. तुम्ही वॉशिंग्टन, बर्लिन, पॅरिस, लंडन किंवा इतर शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याची कल्पना करून बघा”, अशी उद्विग्नता या पोस्टमधून सफा यांनी व्यक्त केली आहे.
मोहम्मद सफा यांनी पुढे म्हटले की, इराणवरील संभाव्य अणुहल्ल्याची माहिती उघड करण्यासाठी मी माझी राजनयिक कारकीर्द पणाला लावत आहे. अणू युद्धाचा काळ टाळण्यासाठी खूप उशीर होऊ नये आणि मानवतेविरोधातील या गुन्ह्याचा साक्षीदार होऊ नये म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
सतर्कतेचा इशारा
मोहम्मद सफा यांनी राजीनामा देत असताना जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अण्वस्त्रांच्या वापराची शक्यता अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे अतिशय धोकादायक असून आताच कृती करण्याची आवश्यकता आहे. हा संदेश जगभरात पसरवा, रस्त्यावर उतरा, मानवता आणि मानवतेच्या भविष्यासाठी निदर्शने करा. फक्त लोकच आता हे थांबवू शकतात. तरच इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल, असे कळकळीचे आवाहन मोहम्मद सफा यांनी केले.
