scorecardresearch

संसद अधिवेशन काळातही फौजदारी गुन्ह्यात खासदारांवर कारवाई शक्य!; व्यंकय्या नायडू यांची टिप्पणी

संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण देत सदस्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक करण्यापासून स्वत:चा बचाव करता येणार नाही.

Venkaih Naidu
व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे कारण देत सदस्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक करण्यापासून स्वत:चा बचाव करता येणार नाही. तपास यंत्रणाच्या नोटिसा त्यांना टाळता येणार नाहीत, असे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सभागृहात स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) पाठवल्या गेलेल्या नोटिसांचा सभागृहात निषेध केला होता. हाच मुद्दा शुक्रवारीही विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृह सुरू होताच उपस्थित केला. त्यामुळे साडेअकरा वाजेपर्यंत सभागृह तबकूब झाले पण, त्यानंतर कामकाज सुरू होताच सभापती नायडू यांनी ईडीसारख्या तपास यंत्रणाच्या नोटिसांकडे संसद सदस्यांना दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगितले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगून तपास यंत्रणापासून बचाव करण्यासाठी विशेषाधिकारांचा वापर करता येईल हा सदस्यांचा समज चुकीचा असल्याचे नायडू म्हणाले.   

संविधानाच्या अनुच्छेद १०५ अंतर्गत संसदेच्या सदस्यांना विशेषाधिकार देण्यात आले असून त्या अंतर्गत कोणत्याही अडथळय़ाविना त्यांना संसद सदस्य म्हणून कर्तव्ये पार पाडता येतात. अधिवेशन किंवा समितीची बैठक सुरू होण्याच्या ४० दिवस आधी आणि त्यानंतर ४० दिवसांनी संसद सदस्याला दिवाणी प्रकरणात अटक केली जाऊ शकत नाही. पण, हा विशेषाधिकार फौजदारी गुन्ह्यांमध्ये लागू होत नाही, असे नायडू म्हणाले.

राहुल-प्रियंका ताब्यात

महागाई, बेरोजगारी, जीएसटी आदी मुद्दय़ांवरून काँग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून आंदोलन केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा तसेच, मल्लिकार्जुन खरगे आदी निदर्शने करणारे खासदार व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संसदेमध्ये लोकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार चर्चा करू देत असल्याने काँग्रेसने शुक्रवारी दोन स्वतंत्र मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला. संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. विजय चौकात जमावबंदी लागू केल्यामुळे पोलिसांनी खासदारांना ताब्यात घेतले. संसदभवनात मुख्य प्रवेशद्वारावर सोनिया गांधींसह खासदारांनी घोषणाबाजी केली. काँग्रेस मुख्यालयापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले. पोलिसांनी केलेली नाकाबंदी तोडून प्रियंका यांनी काँग्रेस मुख्यालयासमोर बसकण मारली. तिथून प्रियंका यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

‘काँग्रेसमध्ये लोकशाही आहे का?’

देशात लोकशाही नाही म्हणणाऱ्या राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये लोकशाही आहे का, हे सांगावे. तुमच्या आजीने, इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीवर गदा आणली होती, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Possible take action mps criminal cases parliament sessionvenkaiah naidu ysh

ताज्या बातम्या