scorecardresearch

‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’, हिंदू संघटनेने छापलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर चर्चेत!

तामिळनाडूमधील ‘इंदू मक्कल काची’ या राजकीय पक्षाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक वादग्रस्त पोस्टर जारी केला आहे.

‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’, हिंदू संघटनेने छापलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर चर्चेत!
फोटो-एएनआय

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत तामिळनाडूमधील ‘इंदू मक्कल काची’ (हिंदू लोकांचा पक्ष) या राजकीय पक्षाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक वादग्रस्त पोस्टर जारी केला आहे. या पोस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवा पोशाख परिधान केल्याचं दाखवलं आहे. यातून आंबेडकर हे ‘भगव्या’ विचारांचे नेते असल्याचं चित्रित करण्याचा प्रयत्न ‘इंदू मक्कल काची’ पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

हे पोस्टर राज्यभरात विविध ठिकाणी भिंतीवर लावलं आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तामिळनाडूमधील व्हीसीकेचे प्रमुख आणि खासदार थोल थिरुमालावलन यांनी या घटनेचा निषेध केला असून “भारतीय राज्यघटनेच्या जनकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून हा फोटो त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे” अशी प्रतिक्रिया थिरुमालावलन यांनी दिली.

हेही वाचा- बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘इंदू मक्कल काची’ या पक्षाने राज्याच्या काही भागांमध्ये आंबेडकरांचं पोस्टर भिंतींवर लावलं आहे. ज्यामध्ये आंबेडकरांच्या अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्माच्या तीन रेषा लावण्यात आल्या आहेत. आंबेडकरांच्या या फोटोतून ते ‘उजव्या विचारांचे’ असल्याचं चित्रित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर ‘इंदू मक्कल काची’चे नेते अर्जुन संपत आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांचाही फोटो लावण्यात आला आहे. हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:16 IST

संबंधित बातम्या