उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊ शहरामध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टर्समध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे ब्राह्मणांचे रक्षक असल्याचे म्हटले आहे. हे पोस्टर हजरतगंज परिसरातील दारुल शफामधील आमदार निवासाच्या भिंतीवर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या वादग्रस्त पोस्टमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याबरोबरच केशव प्रसार मौर्य आणि भाजपाच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचे फोटोही आहेत. ब्राह्मणांवर होत असणाऱ्या कथित अत्याचाराही विरोध करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे असं ‘जनसत्ता’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे

हे पोस्टर लावणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोस्टरमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना परशुने ब्राह्मणांवर वार करताना दाखवलं आहे. योगींबरोबरच या पोस्टवर केशव प्रसाद मौर्य आणि भाजपाच्या इतर नेत्यांचेही फोटो दिसत आहेत. ‘बेटी बचाओ भाजपा भगाओ, बंद करो ब्राह्मणों पर अत्याचार, ना भ्रष्टाचार ना गुंडाराज अबकी बार अखिलेश सरकार’ अशा घोषणाही या पोस्टवर लिहिण्यात आल्या आहेत. या पोस्टवर डॉक्टर आणि करोना रुग्णाचे प्रतिनिधिक फोटो दाखवण्यात आला आहे. त्याखाली ‘करोना साथीच्या नावाखील पैसे उकळले जात आहेत’ असा मजकूर लिहिला आहे.

या पोस्टर्सवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ब्राह्मणांचे हित लक्षात घेणारा नेता असं दाखवण्यात आलं आहे. काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार समाजवादी पक्षाच्या छात्र सभेचे प्रदेश सचिव विकास यादव यांनी लावलं आहे. या पोस्टर्सवर हिंदू देवता असणाऱ्या भगवान परशुरामाचाही फोटो लावण्यात आला आहे.

या पोस्टरमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने येथे पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी पोस्टर काढण्यास सुरुवात केली. या प्रकरणी हजरतगंज पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. हे पोस्टर नक्की कोणी या भिंतीवर लावले याचा शोध पोलीस घेत आहेत. या पोस्टरप्रकरणी समाजवादी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.