उत्पादनातील घट, मागणीवाढीमुळे दरवाढ

हरिश दामोदरन, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले होते. यंदा त्याची जागा बटाटय़ाने घेतली आहे. उत्पादनातील घट आणि टाळेबंदीकाळात मागणीत झालेली वाढ यामुळे बटाटय़ाने दराचा उच्चांक नोंदवला.

केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण खात्याच्या माहितीनुसार शुक्रवारी देशभरातील बटाटे आणि टोमॅटोचा सरासरी किरकोळ विक्री दर अनुक्रमे ३० आणि ५० रुपये होता. तीन महिन्यांपूर्वी बटाटे आणि टोमॅटोचा किरकोळ विक्रीदर २० रुपये होता. याच काळात कांद्याचे दर ३० रुपयांवरून २० रुपयांपर्यंत घसरले. अत्यावश्यक वस्तूंच्या ऑनलाईन दुकानदारांनीही बटाटे आणि टोमॅटोच्या सरासरी विक्रीदरात वाढ आणि कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे स्पष्ट केले.

राजधानी दिल्लीत जानेवारीत कांद्याचा किलोचा दर ७८ रुपये होता, तो मार्चमध्ये ३६ रुपयांवर आणि मेमध्ये २२.५० रुपयांवर घसरल्याचे एका ऑनलाईन दुकानदाराने सांगितले. सध्या कांदा २० रुपये किलो असल्याची माहितीही त्याने दिली.  फेब्रुवारीपासून बटाटय़ाचा सरासरी विक्री दर दुप्पट झाला. उत्पादन घटल्याने बटाटय़ाच्या दरात वाढ होत आहे. बटाटय़ाचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. टोमॅटोचा दर जुलैमध्ये ५७ रुपयांपर्यंत वाढण्याआधी त्यात मेपर्यंत घसरण होत होती. जानेवारीत ३० रुपये किलो असलेला टोमॅटो मार्चमध्ये २२ रुपयांवर, मेमध्ये १४ रुपयांवर आला होता.

खरीप हंगामातील पीक आल्यानंतर ऑगस्टच्या मध्यावर टोमॅटोचे दर घटण्याची शक्यता आहे. बटाटय़ाचा खरीप हंगाम ऑगस्टपासून सुरू झाल्यावर दरात घसरण होईल.

पावसाळय़ामुळे बटाटा महाग

मुंबई-ठाणे परिसरात चांगल्या प्रतीचा बटाटा सध्या ३५-४५ रुपये प्रति किलो दराने विकला जात असून कांद्याचे दर २५ ते ३० रुपये किलो इतके आहेत. ‘बाजारात पूर्णपणे वाळलेल्या बटाटय़ांना मागणी जास्त आहे. ओलसर बटाटय़ांना पावसाळय़ात लवकर कोंब फुटून ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या जुन्या बटाटय़ाचे दर जास्त आहेत,’ अशी माहिती नेरूळमधील एका भाजी व्यावसायिकाने दिली.