अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री पॉवेल यांचे निधन

पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे करोनापश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दिली. ते ८४ वर्षांचे होते. 

पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पॉवेल यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांचे  लसीकरणही  झाले होते, अशी माहिती  कुटुंबियांनी दिली. पॉवेल यांच्या रूपाने आम्ही एक असामान्य आणि प्रेमळ पती, वडील, आजोबा आणि महान अमेरिकी असामी गमावली आहे, असेही त्यांच्या कुटुंबियांनी  म्हटले आहे.

पॉवेल १९८९ मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष होते. १९९१च्या आखाती युद्धानंतर त्यांची प्रशंसा केली गेली. पॉवेल यांच्याच कारकीर्दीत अमेरिकेने पनामावर आक्रमण केले आणि १९९१ मध्ये कुवैतमधून इराकी लष्कराला हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. परंतु २००३ मध्ये इराक युद्धाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी दिलेल्या असत्य माहितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. सद्दाम हुसैन  यांनी नरसंहारासाठी गुप्तपणे शस्त्रे सज्ज ठेवल्याच्या माहितीचा चुकीचा हवाला त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दिला होता.

पॉवेल यांचा जन्म ५ एप्रिल १९३७ रोजी न्यू यॉर्कमधील हार्लेम येथे झाला होता. न्यू यॉर्कच्या सीटी कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. भूशास्त्रात पदवी घेतल्यानंतर १९५८ मध्ये ते लष्करात दाखल झाले. १९६०च्या दशकात दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यात ते दोनदा जखमीही झाले होते. १९७९ मध्ये त्यांची ब्रिगेडियर जनरल पदावर बढती झाली. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री बनण्याचा इतिहास त्यांच्यामुळे रचला गेला.

‘अमेरिकी नायक’

माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्य बुश यांनी शोक व्यक्त करताना, ‘‘पॉवेल हे महान लोकसेवक आणि महान अमेरिकी नायक होते, त्यांच्याबद्दल परदेशातही आदराची भावना होती’’, असे म्हटले आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Powell the first black secretary of state of the united states dies akp