पीटीआय, कोलकत्ता : ‘‘राष्ट्रपती पदाची उमेदवारी द्रौपदी मुर्मू यांना देण्याआधी भाजपने विरोधकांशी चर्चा केली असती, तर आम्ही त्यांच्या नावाचा विचार केला असता. परंतु भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आमच्याशी चर्चाच केली नाही. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रपती पद निवडणुकीत ‘एनडीए’ची स्थिती मजबूत झाली आहे, त्यामुळे १८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीत मुर्मू यांना जिंकण्याची संधी आहे,’’ असे मत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता यांनी सांगितले, की अशा घटनात्मक सर्वोच्च पदासाठी एकमत असलेला उमेदवार असणे देशहिताचे असते. मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी भाजपने विरोधकांशी त्यांच्या उमेदवारीबाबत विचारविनिमय केला असता, तर आम्हीही व्यापक हित लक्षात घेऊन त्यावर अनुकूल विचार केला असता.  मात्र, आता आमचा पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीचा निर्णय पाळेल. विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

शिरोमणी अकाली दल भाजप आघाडीसोबत!

राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने शुक्रवारी जाहीर केला. भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांची भेट गुरुवारी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतली होती. मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती नड्डा यांनी बादल यांना केली होती. वादग्रस्त तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शिरोमणी अकाली दलाने भाजपपासून फारकत घेतली होती.

कोन आहेत द्रौपदी मुर्मू, पाहा व्हिडीओ –

बादल यांनी पत्रकारांना सांगितले की, राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय आमच्या पक्षाने घेतला आहे. कृषी कायदे आणि त्यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात तुरुंगवास भोगत असलेल्यांच्या सुटकेचा प्रश्न यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, आमचे भाजपशी अनेक विषयांवर मतभेद आहेत, पण समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो. एका गरीब कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदावर बसविण्याचा हा मुद्दा आहे. त्यासाठी राजकीय मतभेद विसरून आम्ही योग्य निर्णय घेतला आहे. यावर पक्षाच्या मुख्य समितीने तीन तास चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष असलेले बादल हे फिरोजपूरचे तर त्यांच्या पत्नी हरसिमतरकौर या भटिंडय़ाच्या खासदार आहेत. याशिवाय पंजाब विधानसभेत पक्षाचे तीन सदस्य आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power murmu chances win bjp discussed earlier support ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST