नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीबदलाची चर्चा सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेते सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविला जाईल असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला २० नोव्हेंबरला अडीच वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री सिद्धरामैया व उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात सत्तेतील वाटपाचे सूत्र सुरुवातीला ठरले होते असा दावा केला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी नेतृत्वबदलाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम द्यावा अशी सूचना सिद्धरामैया यांनी केली. शिवकुमार यांनीही पाच ते सहा जणांमध्ये गोपनीय करार झाल्याचे सांगितल्याने याबाबत संभ्रम वाढला.

शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत काही आमदार दाखल झाले आहेत. त्याबाबत विचारले असता, त्यांना जाऊ दे, आमदारांना स्वातंत्र्य आहे. ते काय मत देतात ते पाहू असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले. याबाबतचा वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे असेही त्यांनी नमूद केले. कनकपुरा या त्यांच्या मतदारसंघात बोलताना शिवकुमार यांनी सिद्धरामैया यांच्या कार्याचे कौतुक केले. आता सर्वांनी २०२८ ची विधानसभा निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. माध्यमांनी सत्तावाटपाच्या सूत्राबाबत विचारले असता, पत्रकारांनी लिहिले आहे, मी कशाला बोलू? असे नमूद करत थेट भाष्य करणे शिवकुमार यांनी टाळले.

दरम्यान, कर्नाटकमधील मंत्री प्रियंक खरगे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठी घेतील असे प्रियंक यांनी नमूद केले. राज्यातील ‘मतचोरी’ प्रकरण तसेच अन्य विषयांवर चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरगे यांनी राहुल गांधी यांची भूमिका सिद्धरामैया व शिवकुमार यांच्याकडे स्पष्ट केल्याची चर्चा आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दोघांनाही दिल्लीला बोलावले जाईल असे सांगण्यात आले.