चीनमधील झिंजियांग प्रांतात शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती अमेरिकेच्या यूएसजीएसकडून देण्यात आली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी होती. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे.

भूकंपाचे धक्के झिंजिंयाग क्षेत्रातील यूतियानन क्षेत्रानजीक जाणवले असल्याची माहिती चीनच्या माध्यमांकडून देण्यात आली. भूकंपाचे केंद्रस्थान १० किलोमीटर खोलावर होते. दरम्यान, युतियान हे क्षेत्र भारताच्या जवळ असलं तर भूकंपाच्या धक्क्यांचा भारतावर कोणताही परिणाम जाणवला नाही.

यापूर्वी मॅक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७ पेक्षाही अधिक होती. या भूकंपात ५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आतापर्यंत मॅक्सिको आणि आसपासच्या परिसरात त्सुनामीचा धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भारतातही काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या महिन्यात दिल्लीव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु त्याची तीव्रता मात्र कमी होती.