२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती या ठिकाणी ते सभेसाठी चालले असताना त्यांचं चार्टर्ड विमान खाली कोसळलं आणि अपघातग्रस्त झालं. अजित पवारांचं विमान बारामतीजवळ कोसळूनच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर २९ जानेवारीला अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. पती अजित पवार यांचा दशक्रिया विधी झाला नसताना शपथविधीची घाई का? तेराव्या दिवसानंतर शपथ घेता आली नसती का? हे आणि असे प्रश्न विचारले गेले. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असतो हे सांगितलं आहे. दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

अजित पवारांच्या निधनानंतर वेगवेगळ्या माध्यमांतून तसंच अनेक मान्यवरांनी ज्यांचं आमच्या पक्षाशी घेणंदेणं नाही असे लोक उलटसुलट चर्चा करत आहेत. सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या नेतेपदी निवडलं आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दुःखाने सांगावं लागतं आहे की त्या निर्णयावरही लोकांनी वेगवेगळी वक्तव्यं केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोण असेल हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सगळं भान ठेवूनच सुनेत्रा पवार यांच्याबाबतचा निर्णय घेतला. शोकाचा काळ वगैरेही चर्चा करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असतो. तसंच राजकीय पावलं कशी टाकायची, किती दिवस शोक करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवारांनी आमच्या निर्णयाला मान देऊन तो निर्णय घेतला

आम्ही सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांना आम्ही हे सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष तुमच्यामागे ठामपणे उभा आहे. तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी ही विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही ती विनंती मान्य केली. दादा हे कुठेही थांबून राहणारी व्यक्ती नव्हते. आम्ही आमची भूमिका सांगितली त्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला. आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की सुनेत्रा पवार यांनी आमचा आग्रह ऐकला. त्यांनी हे सांगितलं की पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा असतो. त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार मुंबईत आल्या, त्यांचा शपथविधी त्याच दिवशी झाल्या. तरीही आमच्याबाबत उलटसुलट का चर्चा होत आहेत मला कळत नाही. विधीमंडळाचा भाग संपला. त्यानंतर अनेक लोक बोलायला लागले, एक केंद्रीय मंत्रीही बोलले. पण त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली होती. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने प्रक्रिया आणि इतर सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.