१०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा

१०० कोटी लसमात्रांचा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे श्रेय सरकारला द्यायला हवे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, सरकारला याचे श्रेय देणे म्हणजे महासाथीच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा ज्यांना त्रास झाला अशा लाखो कुटुंबांचा ‘अपमान’ आहे, असे त्यांचे पक्ष सहकारी पवन खेरा म्हणाले.

देशातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या गुरुवारी १०० कोटींच्या पलीकडे गेली. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे. याचे श्रेय सरकारला द्यायला हवे’, असे ट्वीट थरूर यांनी केले. ‘करोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेतील चुकीच्या व्यवस्थापनानंतर सरकारने आता अंशत: सुधारणा केली आहे. यापूर्वीच्या चुकांसाठी ते उत्तरदायी आहेत’, असे तिरुवनंतपुरमचे खासदार असलेले थरूर म्हणाले.

सरकारला या कामगिरीचे श्रेय देणे म्हणजे, करोनाच्या चुकीच्या व्यवस्थापनाचे दुष्परिणाम ज्यांनी भोगले आहेत व ज्यांना ते अजूनही भोगावे लागत आहेत अशा लाखो कुटुंबांचा अपमान आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते असलेले खेरा यांनी थरूर यांचे ट्वीट टॅग करून सांगितले. श्रेय घेण्यापूर्वी पंतप्रधांनांनी त्या कुटुंबांची माफी मागायला हवी, असे ते म्हणाले.