अल कायदाचा नेता अयमान अल जवाहिरी याची ध्वनिचित्रफीत ११ सप्टेंबर २००१ मधील हल्ल्याच्या विसाव्या स्मृतिदिनी जारी करण्यात आली असून तो मरण पावल्याच्या बातम्या, तर्क चुकीचे ठरले आहेत.

साइट या गुप्तचर गटाने म्हटले आहे, की शनिवारी जवाहिरीची ध्वनिचित्रफीत जारी करण्यात आली असून जेरूसलेमला तो स्वस्थ राहू देणार नाही. तसेच, जानेवारीत सीरियातील रशियन फौजांवर केलेल्या हल्ल्याची प्रशंसाही त्याने केली आहे.

जवाहिरी याने म्हटले आहे, की वीस वर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले. फेब्रुवारी २०२० मध्ये तालिबानशी त्याबाबत करार झाला होता. अल जवाहिरी याने तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्याचा उल्लेख केलेला नाही, पण त्याने १ जानेवारीला उत्तर सीरियातील रक्का येथे रशियन सैन्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे.

२०२० मध्ये अशा अफवा उठल्या होत्या, की अल जवाहिरी हा आजारी होता व त्यातच तो मरण पावला. त्यानंतर त्याची कुठलीही दृश्यचित्रफीत आली नव्हती. पण आता मात्र तो जिवंत असल्याचे पुरावे देणारी चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे.

साइटच्या संचालक रिटा कात्झ यांनी म्हटले आहे, की तो मरण पावलेला असू शकतो. तसे असेल तर जानेवारी २०२१ नंतर तो मरण पावला असावा. जवाहिरीचे भाषण ६१ मिनिटांचे असून त्याच्या सहाब मीडिया फाउंडेशनने ही ध्वनिचित्रफीत तयार केली आहे. सध्या अल कायदाला आयसिसने मोठे आव्हान दिले आहे. इराक व सीरियात आयसिसने बराच भाग ताब्यात घेतला आहे.