नवीन कायदा करण्याचे प्रकाश जावडेकर यांचे सूतोवाच
हरित निकषांचे पालन न करणाऱ्यांना आर्थिक दंड व तुरूंगवासाची कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार असून पर्यावरणाचे संरक्षण हा त्यामागचा हेतू आहे असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. निकषांचे पालन सोपे पण उल्लंघन महागात पडणार अशा प्रकारचे धोरण यात सरकारने आखले आहे. उद्योग, खासगी आस्थापने, सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारी संस्था यांना आता हरित निकषांचे पालन टाळणे महागात पडणार आहे.
पुढील दोन आठवडय़ात प्रस्तावित कायद्यावर सल्लामसलतीचा टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर हे विधेयक मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. पर्यावरण निकषांचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे हा त्यामागचा हेतू आहे.
प्रदूषण व घन कचरा व्यवस्थापन ही मोठी आव्हाने पर्यावरण क्षेत्रात आहेत. निकषांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, आपल्या देशात अनेक कायदे व नियम आहेत पण त्यांचे पालन केले जात नाही.
कायद्यांचे पालन सोपे पण उल्लंघन महागडे अशी स्थिती तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
त्यामुळे नागरी दंडाचा कायदा केला जात आहे. यात आर्थिक दंड व तुरूंगवासाची शिक्षा यांचा समावेश आहे, पूर्वीच्या कायद्यातही या तरतुदी आहेत पण अंमलबजावणी काहीच नाही त्यामुळे आम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी अंमलबजावणीवर भर देणार आहोत. सरकारने कचरा व्यवस्थापनाबाबत सहा नवीन नियम केले आहेत त्यात घन कचरा व्यवस्थापनाचे निकषही दिले आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था व उद्योग नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना शिक्षा केली जाईल.