Prakash Raj on Regime Change Controversy: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी १५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमचा लढा हा सत्ता उलथवून (रिजीम चेंज) लावण्यासाठी असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे झाले, ते विरोधकांना भारतात करायचे आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रशांत भूषण यांच्या विधानापासून अंतर राखले. आता अभिनेते प्रकाश राज यांनीही यावर आपली भूमिका मांडली आहे. सत्ता उलथवून लावण्याचे काम लोकशाही पद्धतीने होईल, असे ते म्हणाले.

अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकाश राज यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी संवाद साधला. सत्ता उलथवून लावण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. परंतु हे निवडणूक आणि घटनात्मक मार्गानेच झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. बांगलादेश आणि नेपाळमध्ये २०२४ व २०२५ मध्ये मोठी जनआंदोलने झाली, ज्यामुळे तेथील सरकार कोसळले होते. भारतात हे होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

आम्हाला सरकार खाली खेचायचे आहे आणि आम्ही ते लोकशाही मार्गाने खाली आणू, असे सांगताना प्रकाश राज यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपासून ते २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच्या लढ्याची रुपरेषा मांडली. “आम्ही नेपाळ किंवा बांगलादेश नाही. आमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग आहेत. आमच्याकडे संविधान आहे. आम्हाला मतदानाचा हक्क आहे”, असेही ते पुढे म्हणाले.

‘दाल मे कुछ काला है’

सरकारकडून हिंसाचार केला जात आहे, असा आरोपही प्रकाश राज यांनी केला. “पंतप्रधान मोदींच्या हर घर तिरंगा मोहिमेचे काय झाले. देशातील तरुण जर शांततेच्या मार्गाने राष्ट्रध्वज फडकवत असतील तर त्यात अडचण काय आहे. दिल्ली पोलीस आंदोलक, महिला, मुलींना रस्त्यावरून फरफटत नेत आहेत. या देशातील तरूण आणि नागरिक ज्ञानेश कुमार यांना प्रश्न विचारत आहेत. तर तुम्ही त्याच्या आड येणारे कोण आहात? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्यापासून अडवत आहात याचा अर्थ दाल मे कुछ काला है”, अशी टीका प्रकाश राज यांनी केली.

‘प्रश्न विचारणे म्हणजे अराजकता नाही’

शांततापूर्ण पद्धतीने प्रश्न विचारणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करणे, ही अराजकता होत नाही. देशातील नागरिक आपला घटनात्मक अधिकार वापरून प्रश्न विचारत आहेत आणि आंदोलन करत आहेत. आमच्याकडे शस्त्र नाही, आमच्याकडे संविधान आहे. आमच्याकडे निषेध करण्याचा अधिकार आहे, असेही प्रकाश राज म्हणाले.

वकील प्रशांत भूषण काय म्हणाले?

दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “जर सरकारला असे वाटत असेल की ही सत्ता परिवर्तनाची लढाई आहे, तर हो आम्हाला सत्ता परिवर्तन हवेच आहे. यात चुकीचे काय आहे? लोकशाहीत सरकार बदलण्याची मागणी करणे हा काही गुन्हा नाही. नागरिकांना लोकशाही मार्गांने सरकार बदलण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे”