दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर आंदोलनस्थळावरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेत्यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सौरव दास आणि आशूतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे. “तुम्ही आंदोलनाची जागा बदलू शकता, पण या देशाचा आवाज दाबू शकत नाही; हा आवाज रोखला तर संपूर्ण देशच जंतर-मंतर बनेल,” असा इशारा प्रकाश राज यांनी दिला आहे.

आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत ६१ वर्षीय प्रकाश राज यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि सरकारच्या धोरणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रध्वज घेऊन प्रवेश केला म्हणून ५ दिवसांची जेल?

मंगळवारी CJP चे कार्यकर्ते राष्ट्रध्वज हातात घेऊन जंतर-मंतर परिसरात दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना अडवून अनधिकृत प्रवेशाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आणि बुधवारी न्यायालयाने सौरव दास आणि आशूतोष रांका यांची तिहार तुरुंगात रवानगी केली.

या कारवाईवर संताप व्यक्त करत प्रकाश राज म्हणाले, “हातात देशाचा तिरंगा घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या तरुणांना ५ दिवसांची कोठडी दिली जाते? एवढी अस्वस्थता का? सरकारने दिल्लीत गुंड सोडले आहेत, जे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर आणि विशेषतः महिला आंदोलकांवर अत्याचार करत आहेत. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही? त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले जात नाहीत?”

‘प्रश्न विचारण्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागणार?’

जंतर-मंतर हे वर्षानुवर्षे लोकशाहीतील आंदोलनांचे केंद्र राहिले आहे. मात्र, प्रशासनाने हे ठिकाण आंदोलनासाठी प्रतिबंधित घोषित करून आंदोलकांना रामलीला मैदानावर जाण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयाचा समाचार घेताना प्रकाश राज म्हणाले, “जंतर-मंतर बंद करून आम्हाला रामलीला मैदाना पर्याय दिला जात आहे. पण संपूर्ण वर्षात रामलीला मैदान फक्त दोन दिवस मोकळे असते. शिवाय तिथे आंदोलनासाठी ५० हजार रुपये शुल्क आणि तितकीच अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागते. म्हणजे या देशात सरकारला प्रश्न विचारण्यासाठीही नागरिकांना पैसे मोजावे लागणार का? एवढीच अडचण असेल तर आंदोलनाची जागा अंदमान-निकोबार, एखा वाळवंट किंवा थेट हिमालयाच्या टोकावर हलवा आणि तिथे जाऊन आंदोलन करा असं सांगा!”

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

देशभरात राबवल्या जाणाऱ्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आणि वैध मतदारांची नावे वगळल्याचा आरोप CJP सह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने केला आहे. याविरोधात तरुण वर्ग आणि विविध विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीसह अनेक शहरांत निदर्शने सुरू आहेत.

दिल्ली विमानतळावर विमाना उतरताच CJP नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशूतोष रांका यांना आधी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जंतर-मंतरवर निदर्शने केल्याप्रकरणी दास आणि रांका यांची तिहार कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आपल्या व्हिडिओ संदेशाचा शेवटी प्रकाश राज यांनी इशारा दिला की, लोकशाहीत नागरिकांचे हक्क हिरावून आणि आंदोलनांवर निर्बंध लादून सरकार लोकांचा असंतोष दाबू शकत नाही. “तुम्ही कितीही दडपशाही केली तरी जनता प्रश्न विचारतच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.